सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

कपिलला चुटकी सुंदर वाजविता येते, आणि दहा वजा चार सत्तावीस भागिले तीन यासारखी गणिते तो चुटकीसरशी करतो. पण लेखी गणित म्हणजे त्याच्या लेखी क्रमांक एकचा दुश्मन!
एकदा ही मला म्हणाली, ‘रोज आठ अधिक चार, बारा वजा चार असलीच गणिते शिकवू नका त्याला. लेखी गणितही घाला. त्या गणितांचीही त्याला सवय झाली पाहिजे...’
मग मी त्याला एक गणित घातले: एका झाडावर वीस आंबे आहेत. त्यांपैकी पाच आंबे पाडाला आले आहेत, तर झाडावर किती कच्चे आंबे आहेत?
झाले! कुरुक्षेत्रावर समोरची कौरव-सेना पाहताच अर्जुनाने जसे हातातील ‘गांडीव’ खाली ठेवले तद्वत कपिलने हातातली पाटी खाली ठेवली. म्हणाला,
‘मी काही नाही जा, बाबा!’
‘का रे? काय झाले?’
‘मला असली गणितं नकोत...’
‘मग कसली पाहिजेत?’
‘दहा वजा बारा, तीन अधिक चाळीस-असली.’
’अरे, पण तुला असलीही गणितं आली पाहिजेत.’
‘का?’
‘कारण परीक्षेत असलीही गणितं विचारतात’
‘होय?’
‘मग? कर आता-’
मग त्याने पाटी हातात घेतली. पण काही वेळ तो थंडच बसला. पाटीवर टकटक करीत...
मी म्हटले, ‘गणित मोठ्ठयाने वाच. मोठठ्याने वाचले, की समजते...काय करायचे आहे, काय विचारले आहे ते...’
त्याने अथपासून इतीपर्यंत गणित वाचले.
‘छान! हं, सांग आता! गणितात काय काय सांगितले आहे?’
‘एका झाडावर-’ एका श्वासात त्याने पुन्हा सगळे गणित वाचले.
‘बरोबर, आता सांग, गणितात काय विचारले आहे?’
‘एका झाडावर-’ तो पुन्हा झाडावर चढला.
‘बरोबर, मग आता काय केले पाहिजे?’
‘आता गणित केले पाहिजे’
‘बरोबर, गणितात काय सांगितलेले आहे?’
‘एका झाडावर-’
‘सगळे गणित वाचू नको’ मी थोडासा माझा आवाज चढवला. कारण माझ्या प्रत्येक प्रश्नाला तो ‘झाडावर-’ नेत होता.
तो विचारवंतासारखा विचारमग्न झाला. एकदा माझ्याकडे, एकदा पाटीकडे-असा पाहत बसला.
‘आता मला सांग, झाडावर एकूण किती आंबे आहेत?
‘वीस-’ त्याने ओरडून सांगितले.
‘अगदी बरोबर, आता सांग-पाडाला आलेले आंबे किती आहेत?’
‘पाच.’ तो पुन्हा ओरडला.
‘छान! आणि असं भुंकू नको, हं-आता आपल्याला कोणती संख्या काढली पाहिजे?’
‘कच्च्या आंब्यांची संख्या काढली पाहिजे-’
‘बरोबर- ती किती आहे?’
तो चूप!
‘म्हणजे आपल्याला कच्च्या आंब्यांची संख्या माहीत नाही, होय की नाही?’
त्याने मान डोलविली.
‘मग ती संख्या काढायची, सोप्पं आहे, कर आता!’
थोडा वेळ मी खाली गेलो.
परत येऊन पाहतो तर-तर काय? पाटीच्या दुस~या बाजूला तो रेघोटया मारीत बसला होता. मला रागच आला. वाटले, एक थोबाडीत ठेवून द्यावी. पण मी माझा राग आवरला आणि त्याला शांतपणे विचारले,
‘हं, सांग आता- काय काय केलं?’
‘एका झाडावर-’ तो पुन्हा झाडावर चढला
त्याला झाडावरून सावकाश खाली घेत मी विचारले,
‘झाडावर एकूण किती आंबे आहेत?’
‘एका झाडावर वीस आंबे आहेत-’
‘पाडाला आलेले आंबे किती आहेत?’
‘पाच-मामा, झाड पाडाला येत नाही?’
‘फालतू विचारू नको, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हं- सांग- आता आपल्याला कोणती संख्या काढाली पाहिजे?’
‘कच्च्या आंब्यांची संख्या काढली पाहिजे’
‘बरोबर, ती किती आहे?’
‘ती आपल्याला माहीत नाही’
‘शाब्बास! अगदी बरोबर-मग आता आपल्याला काय करावं लागणार?’
‘गणित करावं लागणार.’
‘ते झालं रे, पण गणित कशाचं आहे?’
‘भागाकाराचं!’
‘आँ-??’
‘गुणाकाराचं-’
‘गुणाकाराचं?’
‘होय..’
तो शांत. मी संतप्त...
त्याने पटकन गणित केले. वीस गुणिले पाच बरोबर शंभर!
‘शंभर- हे काय आहे?’
‘उत्तर आहे.’
‘पण ते कशाचे उत्तर आहे?’
‘गणिताचे-या गणिताचे!’ त्याने पाटीवर पेन्सिल नाचवून मला गणित दाखवले.
आता मात्र माझा ‘स्टँमिना’ पूर्ण खलास झाला.
‘वीस ही कशाची संख्या आहे?’
‘झाडांची संख्या आहे...’
‘झाडांची संख्या आहे? पुन्हा एकदा चाह पाहू गणित-’
’एका झाडावर वीस आंबे आहेत-’
‘थांब-’ त्याला मध्येच थांबवीत मी विचारले, ‘वीस ही संख्या कशाची संख्या आहे?’
‘एका झाडावरील झाडांची संख्या- नाही, नाही, आंब्यांची संख्या आहे.’
‘बरोबर, आता गणितात दुसरी संख्या कोणती दिली आहे?’
‘पाच.’
‘पाच ही कशाची संख्या आहे?’
‘पाच ही पाडाला आलेल्या आंब्यांची संख्या आहे.’
‘बरोबर, वीस आंब्यांपैकी पाच आंबे पाडाला आले आहेत. पाडाला आलेले आंबे बाजूला काढून ठेवले, की-’
‘कच्चे आंबे मिळतील.’
‘अगदी बरोबर, पण त्यासाठी काय केले पाहिजे?’
‘गणित केले पाहिजे-’
‘मग कर पाहू,’
‘वीस भागिले पाच-’
‘नाही, वीस गुणिले पाच-’
‘गुणिले? ’ कपिलच्या उत्तराने मी तर कावूनच गेलो. म्हणालो, ‘अरे, बाबा, वीस आंब्यांमधून पाच आंबे जर बाजूला केले तर आंब्यांची संख्या कमी होईल, की जास्त होईल?’
‘जास्त होईल-’
‘जास्त होईल?’
‘नाही, नाही-कमी होईल..’
‘मग काय केले पाहिजे?’
‘वजाबाकी!’
ह्या लेखी गणितांना कंटाळून कपिलने मला एकदा प्रश्न केला होता.
‘मामा, धृवबाळाचं एक बरं आहे बघ रे...’
मला त्याचे बोलणे समजले नाही. मी विचारले, ‘म्हणजे?’
‘म्हणजे त्याला गणितंबिणितं काही करावी लागत नाहीत रे!’
मग अधिक गंभीर होत त्याने मला प्रश्न केला,
‘मी तर आणखी थोडासा मोठठा झाल्यावर धृवबाळच होणार बघ बाबा! पण मामा, तपश्चार्येसाठी जंगलातच जावं लागते काय रे?’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा