सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

एकदा काय झाले, माडीवर मी कोणतेसे पुस्तक वाचीत बसलो होतो. माझ्या शेजारीच त्या दिवशीचे वर्तमानपत्र पडले होते.
थोडया वेळाने ‘मामा’, ‘मामा’ कारीत स्वारी आली. आणि वर्तमानपत्राकडे लक्ष जाताच त्याच्या जवळ बसली. वर्तमानपत्रातील फोटो, चित्रे, मागच्या पानावरील सिनेमाच्या-नाटकाच्या जाहिराती पाहू लागली आणि त्यातच रंगून गेली...
तेवढयात त्याचे चित्त पहिल्या पानावरील एका फोटोने वेधून घेतले. त्या फोटोचे त्याचे सूक्ष्म निरीक्षण सुरू झाले. त्याला तो फोटो खूप आवडला असावा आणि त्या फोटोबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले असावे. कारण एक गुडघा पेपरवर ठेवून लंगडया बाळकृष्णाच्या पोझमध्ये त्याने मला प्रश्न केला,
‘ मामा-मामा, हा फोटो कुणाचा रे?’
‘खाली नाव लिहिले आहे बघ, ते वाच-’ मी हातातील पुस्तक मिटवत उत्तरलो
‘रा-रा- राष्ट्र-राष्ट्रप-राष्ट्रपती!’ एकेक अक्षर जुळवीत त्याने ‘राष्ट्रपती’ हा शब्द वाचला आणि मला प्रश्न केला, ‘ मामा, राष्ट्रपती म्हणजे काय रे?’
जाता जाता तेवढीच त्याला माहिती मिळावी, त्याच्या सामान्यज्ञानात भर पडावी या भावनेने मी त्याला सोप्या शब्दात सांगू लागलो, ‘यांना राष्ट्रपती म्हणतात. हे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती- म्हणजे मुख्य आहेत. यांचे नाव झैलसिंग असे आहे-ग्यानी झैलसिंग! आहे की नाही लिहिलेले खाली?’
मग त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली- त्यांनी दाढी का वाढविली आहे, त्यांचे नाव असले का आहे, तू का दाढी राखत नाहीस, आपल्याला राष्ट्रपती होता येईल काय, त्यासाठी कितवीपर्यंत शिकावे लागते, शंभरावीपर्यंत की हजारावीपर्यंत... वगैरे
त्याला समजेल अशा भाषेत मीही त्याचे समाधान केले.
पण तरीही त्याचे समाधान झाले नसावे. त्याने मला फिरून तोच प्रश्न केला, ‘ खरं मामा, राष्ट्रपती म्हणजे नक्की कोण?’
क्षणभर मी गोंधळलो. त्याला नेमके काय उत्तर द्यावे ते मला समजेना. पण लगेच सुचले. म्हणालो, ‘अरे, राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा पती, म्हणजे प्रमुख!!’
‘म्हणजे राजाच म्हण की!’ त्याने आपल्या परीने अर्थ घेतला.
‘करेक्ट! अगदी बरोबर! राष्ट्रपती म्हणजे राजाच. तोच राज्याचा मुख्य असतो!’
आपल्या उजव्या हाताच्या अंगठयाजवळचे बोट राष्ट्रपतींच्या फोटोवर ठेवून त्याने पुन्हा पृच्छा केली. म्हणाला,
‘ म्हणजे हा आपल्या भारत देशाचा राजा आहे?’
‘ हो, आणि हे बघ-’ थोरामोठयांबद्दल कसे आदराने बोलायचे असते, ते त्याला समजावे म्हणून मी त्याला म्हणालो, ‘ यांना ‘हा’ असे म्हणायचे नाही, ‘हे ’ असे म्हणायचे’
‘का?’
‘अरे, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. आपल्यापेक्षा मोठया माणसांना ‘अहो-जाहो’ म्हणायचे असते. तू तुझ्या बाबांना
‘अरे-जारे-’ असे म्हणतोस काय?’
‘नाही’
‘का?’
‘कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत.’
‘शाळेतल्या बाईंनाही तू ‘अहो, बाई’ असेच म्हणतोस की नाही?
‘होय’
‘की ‘ए बाई’ असं म्हणतोस?’
‘नाही-नाही-’ तो खळखळून हंसू लागला. कारण त्याच्या बाईंना मी ‘ए बाई’ असे म्हटल्यामुळे त्याला गंमत वाटली होती.
‘मग? आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना आदराने बोलावे, समजलं?’
माझ्या प्रश्नाने तो निरुत्तर झाला.
पण क्षणभरच! कारण त्याच्या पुढच्या प्रश्नाने मलाच कायमचे निरुत्तर केले.
‘पण मामा,’ त्याने प्रश्न केला,‘ तू माझ्यापेक्षा इतका मोठा आहेस, मी कसं रे तुला ‘अरे-जारे’ म्हणतो? आणि तूही कसं ऎकून घेतोस?’
आकाशीच्या चंद्राला ‘चंद्राकाका’, ‘चंदाकाका’ न म्हणता ‘चंदामामा’, ‘चांदोमामा’ म्हणणा~या लहान बालकाच्या कोवळ्या ह्रुदयातील नाजूक भावना मी जाणतो, पण त्या कशा व्यक्त करायच्या आणि तेही या सात-आठ वर्षांच्या चिमुरडया पोरापुढे!!
असाच PÀकितीतरी वेळ गेला. तो काय करतो, ते पाहावे म्हणून मी हळूच हातातील पुस्तकातून डोळे बाहेर काढले. तर बहाद्दराचे डोळे अजून राष्ट्रपतींच्या चित्रावरच खिळलेले होते. माझे पाहणे त्याच्या लक्षात आले असावे. लगेच त्याचे प्रश्नोपनिषद सुरू झाले-
‘म्हणजे मामा, या राजांकडे राजवाडा आहे?’
‘हो, आहे ना!’
‘कुठे?’
‘दिल्लीला! दिल्लीला आपल्या देशाची राजधानी म्हणतात!’ त्याला एक चमचाभर सामन्यज्ञान पाजण्याचा मोह मला आवरता आला नाही.
‘हां, हां-’ असे म्हणत त्याने आपली मान हलवली, आणि पुन्हा तो त्या फोटोकडॆ पाहू लागला. डोळे बारीक-मोठे करीत...
बहुतेक स्वारी कसलातरी मोठा विचार करते आहे, हे मी चेह~यावरून ताडले.
आपले दोन्ही डोळे अधिक मोठे करून माझ्याकडे पाहत त्याने विचारले, ‘मामा, म्हणजे या राजांकडे सैन्य आहे?’
‘हो, आहे ना!’
‘खूप मोठ्ठं आहे?’
‘हो, खूप खूप मोठठं आहे!’
‘ म्हणजे आकाशाएवढं?’ त्याने दोन्ही हात पसरून आकाश दाखवले.
‘हो, हो-’
‘आणि तलवारी, ढाली, बंदुका, भाले-?’
‘हो, त्याही आहेत ना!’
‘खूssssप?’
‘हो, अगदी खूप ssssखू ssss ssssप! आणि बरे का, या आपल्या राजांचे सैन्य खूप म्हणजे खूप शूर आहे! राजांनी सैन्याला आज्ञा दिली, की सैन्य लढाईला जाते आणि एका मिनिटात शत्रूचा पराभव करून येते. हा-साधे सैन्य नाही बाबा ते!’
शत्रूच्या पराभवाच्या कल्पनेने त्याच्या चेह~यावर विजयानंद पसरला!
पण पुढच्याच क्षणाला काय झाले कुणास ठाऊक! त्याचा चेहरा एकदम पालटला. तो माझ्याकडे वाईट डोळे करून पाहू लागला. त्याच्या नजरेत संताप होता. चीड होती. आरोप होता. तो थरथरू लागला. आपल्या परमविश्वासातली एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी महत्वाचे सांगत असावी, आपण जिवाचा कान करून ते ऎकत असावे, आणि- आणि आपल्याला ती व्यक्ती काहीतरी खोटे सांगून फसवत आहे, अशी जाणीव होऊन एकदम आपण त्या व्यक्तीवर भडकून उठावे, तसा तो माझ्यावर जळजळीत भडकला. म्हणाला, ‘सेनापती रे, सेनापती सैन्याला आज्ञा देतो, राजा नव्हे!!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा