सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

अलीकडे ही मोडक्या-तोडक्या कविता करू लागली आहे. कसे काय कुणास ठाऊक-पण मीही तशाच कविता करू लागलो आहे. कविता म्हणजे तशा कविता नव्हेत, उगीच आपले ट’ ला ‘ट’ आणि ‘री’ ला ‘र्री’ जुळवायचे. आपली एक गंमत म्हणून आणि तेही लहर लागली तर! परंतु याचा परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हा उभयतांचे व्यावहारिक संभाषणही प्रास-यमक-वृत्तबद्ध होत आहे. म्हणजे असे:
सर्व वारांमध्ये मला रविवारच अधिक आवडतो. कारण त्यादिवशी सकाळी खूप उशिरापर्यंत झोपायला मिळते. प्रत्यक्ष प्रेम करायला फार कमी मिळते, हा भाग वेगळा, पण माझे सर्वात जास्त प्रेमा कुणावर असेल तर ते झोपेवरच! रविवारी किंवा सुटीच्या दिवशी खूप खूप झोपायला मिळावे म्हणून मी आदल्या रात्री अर्धा-पाऊण पिंट राँकेल जाळतो. परंतु अजून तरी रविवारसकट सगळ्या सुटयांची स्थिती ना.सी.फडके यांच्या ‘रविवार’ सारखीच झालेली आहे. पुढचा जन्म जर असेल, व तो जर मिळाला, आणि तशी ‘अनुकूल’ परिस्थिती सुदैवाने लाभलीच, तर उभे आयुष्य झोपून काढण्याचा माझा मानस आहे...
तर काय सांगत होतो मी? हां-तर सुटीच्या दिवशी मला उठायला किंचित उशीर होतो आहे, असे हिला वाटायला लागले, की ही सावकाश माडीवर येते, आणि माझ्या तोंडावरची चादर हलक्या हाताने काढत म्हणते-
‘उठा, उठा हो मालक।
आला अंगणीं रविबालक।
भिंतीवरचे वाँलक्लाँक।
(‘भिंती’ वरचे वाँलक्लाँक’ हं!)
काय कथिते परिसा तरी॥’
तिकडे रेडियोवर ‘मालवून टाक दीप’ लागले, की तो दीप मालवायच्या आत माझ्या इकडे ओळी तयार असत-
‘मालवून टाक लाईट, आँफ करून स्विच स्विच।
राजसा किती दिसात, जाहला तुला न लेट’
तिकडे ‘का हासला किनारा, पाहून धुंद लाट’ संपले की माझे इकडे तयार असते- ‘पाहुनिया विहिरीला, का हासला रहाट?’
या सा~याचा कपिलच्या टाळक्यावर एक वाईट्ट परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हाला हवे असलेले शब्द, यमक वगैरे आपल्या बालबुद्धीप्रमाणे तो आम्हाला पुरवू लागला आहे. ...
एकदा असेच झाले. सुटीच्या दिवशी मी माडीवर काहीतरी लिहीत बसलो होतो. दुपारचा एकचा सुमार असावा. स्वयंपाक करून ठेवून ही मला वरंवार ‘उठताय ना जेवायला?’, ‘येताय ना जेवायला?’ असे खालून विचारीत होती. मीही मान वर न करता तिच्या प्रत्येक प्रश्नाला ‘झालेच-’, ‘आलोच-’ असे उत्तर देत होतो.
पण माझे ते ‘झालेच-’ काही लवकर होत नव्हते, आणि ती दर सेकंदाला चिडत होती.....
काही वेळाने टपालवाल्याने तिचे नाव पुकारून पत्र टाकले. ती आनंदली. कारण पत्र माहेरचे होते. माडीच्या पाय~या चढत, ‘ओवी’ टोन मध्ये शब्द गुंफत ती म्हणाली-
‘उठा, उठा हो साहेब।’
पण गाडीचे चाक रुतले. पुढची ओळ काय टाकायची, ते तिला सुचेना. मात्र तिच्या पदराचे टोक धरून तिच्या मागून येणा~या कपिलने आपल्या बालबुद्धीने तिची अडलेली गाडी पुढे ढकलली. म्हणाला-
‘उठा, उठा हो साहेब। करा जोंधळ्याचा हिशोब॥’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा