सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

सकाळी नऊ-दहाच्या सुमारास बिच्चू गल्लीतून एखादी मिरवणूक जात असताना त्या मिरवणुकीपुढे वाजणा~या बँडच्या तालावर, अंगाला नखशिखांत साबण फासलेल्या व घरापुढच्या पायरीवर तन्मयतेने नाचणा~या नागडया छोटया मुलाने कधीकाळी तुमचे डोळे खेचून घेतल्याचे जर तुम्हाला आठवत असेल, तर तुम्ही खुशाल समजा- तो मुलगा म्हणजे कपिलच!!
काही काही माणसे जन्माला येताना आपल्या तोंडातून चांदीचे चमचे वगैरे वगैरे अशा कितीतरी वस्तू घेऊन येतात! परंतु अगदी लहानपणापासूनचे कपिलचे बँड-प्रेम पाहिले, की माझ्या मनात विचार येतो- क्लँरोनेट वाजवीतच त्याने या जगात ‘एंट्री’ घेतली असावी!... कारण बँडचा आवाज कानावर पडला रे पडला, की अजूनही त्याची, आईचा आवाज ऎकताच हलक्या झोपेतून हडबडून उठणा~या व कान ताठ करून इवल्या इवल्या डोळ्यांनी काव~याबाव~या नजरेने टुकूटुकू पाहणा~या मांजरीच्या पिलासारखी स्थिती होते. भातुकलीच्या बाहुला-बाहुलीच्या लग्न-खेळातील त्याची ‘बँड’ वाल्याची ‘सीट’ सतत रीझर्व असते ती त्यामुळेच! आणि एखादा इच्छुक बँडवाला आलाच तर तो त्याला सुनावतो, ‘ बँड वाजवायचा म्हणजे ते काही सोप्पं नाही बाबा! होय की नाही हो?’ शेवटचा प्रश्न अर्थातच तेथे जे कोणी मोठे माणूस असेल, त्याला उद्देशून असतो
एकदा एक ‘पाहुणा’ बँडवाला अनपेक्षितपणे लग्नमंडपात दाखल झाला होता. त्यावेळी कपिलची आणि त्या नव्या बँडवाल्याची अशी काही जुगुलबंदी रंगली होती, की हां-हां म्हणता लग्नमंडपाचे युद्धभूमीत रूपांतर झाले होते!
लग्न, लग्नातील नवरा-नवरी, लग्नघरातला फराळ, नवे कपडे, पक्वान्ने, विजेची रोषणाई या सर्वांपेक्षा त्याला कशात अधिक ‘इंटरेस्ट’ वाटत असेल तर लग्नात वाजवायला आलेल्या ‘बाँड-मंडळीं’ मध्ये!!... नाहीतर एकेक मुले अशा समारंभात कशी खा-खा-खात असतात कधी न मिळाल्यासारखी! पण या बाबाचे निराळेच! लग्नाला आलेली त्याच्या वयाची मुले इकडे खात असतात, नाचत असतात, दंगा करीत असतात आणि हा मात्र तिकडे दूर कोप~यात अंथरलेल्या जाजमावर चिवडालाडू खात बसलेल्या बँडवाल्यांचे, त्यांच्या वाद्द्यांचे, त्यांच्या अंगावरील लालभडक पोषाखाचे निरीक्षण करण्यात हरवलेला!
कपिलच्या या बँडप्रेमाचा त्याच्या आईला एक फार मोठा फायदा होतो इतर मुलांच्या आयांची अशा समारंभातील गर्दीमध्ये आपली हरवलेली मुले शोधताना जशी दमछाक होते तशी कपिलच्या आईची होत नाही. याचा अर्थ तो कधीच हरवत नाही, असा नव्हे, तर अशा समारंभात तो चुकतो-हरवतो, जरी चुकला-हरवला तरी न चुकता हरवलेल्या ठिकाणी अचूक सापडतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा