सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

सकाळी नऊ-दहाच्या सुमारास बिच्चू गल्लीतून एखादी मिरवणूक जात असताना त्या मिरवणुकीपुढे वाजणा~या बँडच्या तालावर, अंगाला नखशिखांत साबण फासलेल्या व घरापुढच्या पायरीवर तन्मयतेने नाचणा~या नागडया छोटया मुलाने कधीकाळी तुमचे डोळे खेचून घेतल्याचे जर तुम्हाला आठवत असेल, तर तुम्ही खुशाल समजा- तो मुलगा म्हणजे कपिलच!!
काही काही माणसे जन्माला येताना आपल्या तोंडातून चांदीचे चमचे वगैरे वगैरे अशा कितीतरी वस्तू घेऊन येतात! परंतु अगदी लहानपणापासूनचे कपिलचे बँड-प्रेम पाहिले, की माझ्या मनात विचार येतो- क्लँरोनेट वाजवीतच त्याने या जगात ‘एंट्री’ घेतली असावी!... कारण बँडचा आवाज कानावर पडला रे पडला, की अजूनही त्याची, आईचा आवाज ऎकताच हलक्या झोपेतून हडबडून उठणा~या व कान ताठ करून इवल्या इवल्या डोळ्यांनी काव~याबाव~या नजरेने टुकूटुकू पाहणा~या मांजरीच्या पिलासारखी स्थिती होते. भातुकलीच्या बाहुला-बाहुलीच्या लग्न-खेळातील त्याची ‘बँड’ वाल्याची ‘सीट’ सतत रीझर्व असते ती त्यामुळेच! आणि एखादा इच्छुक बँडवाला आलाच तर तो त्याला सुनावतो, ‘ बँड वाजवायचा म्हणजे ते काही सोप्पं नाही बाबा! होय की नाही हो?’ शेवटचा प्रश्न अर्थातच तेथे जे कोणी मोठे माणूस असेल, त्याला उद्देशून असतो
एकदा एक ‘पाहुणा’ बँडवाला अनपेक्षितपणे लग्नमंडपात दाखल झाला होता. त्यावेळी कपिलची आणि त्या नव्या बँडवाल्याची अशी काही जुगुलबंदी रंगली होती, की हां-हां म्हणता लग्नमंडपाचे युद्धभूमीत रूपांतर झाले होते!
लग्न, लग्नातील नवरा-नवरी, लग्नघरातला फराळ, नवे कपडे, पक्वान्ने, विजेची रोषणाई या सर्वांपेक्षा त्याला कशात अधिक ‘इंटरेस्ट’ वाटत असेल तर लग्नात वाजवायला आलेल्या ‘बाँड-मंडळीं’ मध्ये!!... नाहीतर एकेक मुले अशा समारंभात कशी खा-खा-खात असतात कधी न मिळाल्यासारखी! पण या बाबाचे निराळेच! लग्नाला आलेली त्याच्या वयाची मुले इकडे खात असतात, नाचत असतात, दंगा करीत असतात आणि हा मात्र तिकडे दूर कोप~यात अंथरलेल्या जाजमावर चिवडालाडू खात बसलेल्या बँडवाल्यांचे, त्यांच्या वाद्द्यांचे, त्यांच्या अंगावरील लालभडक पोषाखाचे निरीक्षण करण्यात हरवलेला!
कपिलच्या या बँडप्रेमाचा त्याच्या आईला एक फार मोठा फायदा होतो इतर मुलांच्या आयांची अशा समारंभातील गर्दीमध्ये आपली हरवलेली मुले शोधताना जशी दमछाक होते तशी कपिलच्या आईची होत नाही. याचा अर्थ तो कधीच हरवत नाही, असा नव्हे, तर अशा समारंभात तो चुकतो-हरवतो, जरी चुकला-हरवला तरी न चुकता हरवलेल्या ठिकाणी अचूक सापडतो!
तर असा हा कपिल म्हणजे माझा भाचा – म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा! गोरा,गोरापान. तरतरीत. टपोरे डोळे. वेधक चेहरा. संपूर्ण नाव कपिल धुंडीराज कुलकर्णी. वय वर्षे आठ. इयत्ता तिसरी. हुषार. लाघवी. जिज्ञासू. विचक्षण. वगैरे. वगैरे.
कपिलला गाण्याची मनस्वी आवड आहे. सुरुवाती-सुरुवातीला तो हिंदी सिनेमातील उडत्या आणि भडक चालीतील गाणी आपली पिटुकली कंबर हलवीत तल्लीन होऊन म्हणत असे. पण जेव्हा तो जिल्ह्याचे गाव सोडून माझ्याकडे राहायला आला- म्हणजे मीच त्याला माझ्या गावाकडे घेऊन आलो- तेव्हापासून त्याची ‘टेस्ट’ बदलली. कदाचित माझ्या धाकामुळे असेल, कदाचित हिच्या, अथवा दोघांच्याही... पण आता त्याला मराठी भावगीते, भक्तिगीते, बालगीते, आवडू लागली आहेत. म्हणतोही छान. म्हणजे ‘षडज’ न सोडता. सुरात. लयीत. तालात. आणि हा ताल तो कधी अँल्युमिनियमच्या डब्यावर, डब्याच्या झाकणावर धरतो तर कधी आपल्या गुडघ्यांवर धरतो...आवाज खणखणीत. उच्चार स्पष्ट. स्वच्छ.
पंचांग आणि ‘वैद्या’ प्रमाणे हार्मोनियमही घरचाच....पण तरीही आमच्या गाणे म्हणण्याच्या व त्याला गाणे शिकविण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तासभर. आणि सुटीच्या दिवशी तर जवळजवळ दिवसभरच... परंतु लहर लागली, की तो माझ्या माडीवरच्या खोलीत येतो, आणि आपल्याच तंद्रीत गाणे सुरू करतो.
मी कामात असेन तर त्याला रागावून चूप करतो. माझा मूड असेल तर क्वचित माझ्यातला ‘केशवकुमार’ जागा होतो....
एकदा रात्रीच्या वेळी आमची मैफिल रंगली होती. मधल्या वाडयातले सुरेशराव पंतांची भजने म्हणत होते. त्यांच्या शेजारीच मांडी घालून बसलेला कपिल देहाचा कान आणि मांडीचा तबला करून ऎकत होता....
सुरेशरावांनी मध्यंतर घेतला आणि तेवढयात कपिलने त्यांना ‘आपली आवड’ बोलून दाखवली. माझ्याकडे मान वर करून बघत म्हणाला, ‘ मामा, ते हे गाणे म्हणायला सांग की रे सुरेशमामांना...’
‘कोणते?’ पेटी थांबवून मी प्रश्न केला.
‘ ते, हे रे-’
त्याला ते नेमके गाणे सांगता येईना. ‘अं ssss’ असे करीत, डोळे बारीक करून तो गाण्याचे शब्द आठवू लागला....
मग मी त्याला, त्याला येत असलेली, माहीत असलेली, आवडत असलेली काही गाणी विचारली. पण प्रत्येक गाण्याला त्याने ‘ते नव्हे रे-’, ‘अंह-’ अशी उत्तरे दिली...
आम्ही सगळे विचार करू लागलो. परंतु त्याला नेमके कोणते गाणे अभिप्रेत होते, ते काही समजेना. मी त्याला विचारले, ‘ शब्द कोणते आहेत, ते तरी सांग बघू त्या गाण्यातले?’
‘ते हे रे-’ चेहरा गंभीर करून तो सांगू लागला, ‘ आरशावरती रावण उडला-’
‘आरशावरती रावण उडला’ असे त्याने म्हटल्याबरोबर मी, ही, सुरेशराव, पलीकडच्या घरातला विजू, मेधा - आम्ही सर्वजन खळ्ळ्कन हंसू लागलो...
आमचे ते हसणे त्याला आपला अपमान वाटला. तो चिडला. रागाला आला. रागाने चेहरा-डोळे चित्रचिचित्र करू लागला....
-शेवटी खूप मंथन केल्यानंतर समजले ते हे, की त्याला हवे असलेले गाणे म्हणजे अरुण दाते यांचे ‘भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी’ हे होते आणि ‘अर्ध्यावरती डाव मोडिला’ चे त्याने ‘आरशावरती रावण उडला’ असे केले होते!
अलीकडे ही मोडक्या-तोडक्या कविता करू लागली आहे. कसे काय कुणास ठाऊक-पण मीही तशाच कविता करू लागलो आहे. कविता म्हणजे तशा कविता नव्हेत, उगीच आपले ट’ ला ‘ट’ आणि ‘री’ ला ‘र्री’ जुळवायचे. आपली एक गंमत म्हणून आणि तेही लहर लागली तर! परंतु याचा परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हा उभयतांचे व्यावहारिक संभाषणही प्रास-यमक-वृत्तबद्ध होत आहे. म्हणजे असे:
सर्व वारांमध्ये मला रविवारच अधिक आवडतो. कारण त्यादिवशी सकाळी खूप उशिरापर्यंत झोपायला मिळते. प्रत्यक्ष प्रेम करायला फार कमी मिळते, हा भाग वेगळा, पण माझे सर्वात जास्त प्रेमा कुणावर असेल तर ते झोपेवरच! रविवारी किंवा सुटीच्या दिवशी खूप खूप झोपायला मिळावे म्हणून मी आदल्या रात्री अर्धा-पाऊण पिंट राँकेल जाळतो. परंतु अजून तरी रविवारसकट सगळ्या सुटयांची स्थिती ना.सी.फडके यांच्या ‘रविवार’ सारखीच झालेली आहे. पुढचा जन्म जर असेल, व तो जर मिळाला, आणि तशी ‘अनुकूल’ परिस्थिती सुदैवाने लाभलीच, तर उभे आयुष्य झोपून काढण्याचा माझा मानस आहे...
तर काय सांगत होतो मी? हां-तर सुटीच्या दिवशी मला उठायला किंचित उशीर होतो आहे, असे हिला वाटायला लागले, की ही सावकाश माडीवर येते, आणि माझ्या तोंडावरची चादर हलक्या हाताने काढत म्हणते-
‘उठा, उठा हो मालक।
आला अंगणीं रविबालक।
भिंतीवरचे वाँलक्लाँक।
(‘भिंती’ वरचे वाँलक्लाँक’ हं!)
काय कथिते परिसा तरी॥’
तिकडे रेडियोवर ‘मालवून टाक दीप’ लागले, की तो दीप मालवायच्या आत माझ्या इकडे ओळी तयार असत-
‘मालवून टाक लाईट, आँफ करून स्विच स्विच।
राजसा किती दिसात, जाहला तुला न लेट’
तिकडे ‘का हासला किनारा, पाहून धुंद लाट’ संपले की माझे इकडे तयार असते- ‘पाहुनिया विहिरीला, का हासला रहाट?’
या सा~याचा कपिलच्या टाळक्यावर एक वाईट्ट परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हाला हवे असलेले शब्द, यमक वगैरे आपल्या बालबुद्धीप्रमाणे तो आम्हाला पुरवू लागला आहे. ...
एकदा असेच झाले. सुटीच्या दिवशी मी माडीवर काहीतरी लिहीत बसलो होतो. दुपारचा एकचा सुमार असावा. स्वयंपाक करून ठेवून ही मला वरंवार ‘उठताय ना जेवायला?’, ‘येताय ना जेवायला?’ असे खालून विचारीत होती. मीही मान वर न करता तिच्या प्रत्येक प्रश्नाला ‘झालेच-’, ‘आलोच-’ असे उत्तर देत होतो.
पण माझे ते ‘झालेच-’ काही लवकर होत नव्हते, आणि ती दर सेकंदाला चिडत होती.....
काही वेळाने टपालवाल्याने तिचे नाव पुकारून पत्र टाकले. ती आनंदली. कारण पत्र माहेरचे होते. माडीच्या पाय~या चढत, ‘ओवी’ टोन मध्ये शब्द गुंफत ती म्हणाली-
‘उठा, उठा हो साहेब।’
पण गाडीचे चाक रुतले. पुढची ओळ काय टाकायची, ते तिला सुचेना. मात्र तिच्या पदराचे टोक धरून तिच्या मागून येणा~या कपिलने आपल्या बालबुद्धीने तिची अडलेली गाडी पुढे ढकलली. म्हणाला-
‘उठा, उठा हो साहेब। करा जोंधळ्याचा हिशोब॥’
‘माझे माहेर पंढरी’ हा कपिलचा परमप्रिय अभंग. ‘पंढरी ssss ’ असा त्याने तार षडजावर अभंग संपवला, आणि तेव्हा जर ‘ही’ समोर असेल तर मला तिची चेष्टा करण्याची लहर येते... मग मी माझा अभंग सुरू करतो. तो लगेच मांडी घालून, मानेला हिसके देत ताल धरतो. अभंगाची पहिली ओळ उत्स्फूर्त येते. मग मात्र दरेक चरणाला पाच-एक सेकंद विचार करून माझा अभंग तयार होतो... अभंग तयार होतो म्हणजे फक्त यमकांची खटपट-शब्दांची जुळवाजुळव! ...
तबला वजवता वाजवता तोही रंगून जातो. अभंग गाता गाता मीही तल्लीन होऊन जातो!-
‘माझे माहेर कोल्हापूरी । आहे पंचगंगा तीरी॥१॥
माझी बहीण विजूताई। तिची सदा गडबड घाई॥२॥
बंडोपंत आहे बंधू । त्याची छाती काय सांगू॥३।
जनता जनार्दनी शरण । करी आहेरची आठवण॥४॥’
अभंग संपतो. कपिलला तो फार आवडतो. कारण त्यात त्याच्या मामीची चेष्टा असते ना! टाळ्या पिटून, ‘होssss’ असा आवाज काढून, मामीकडे पाहत तो आपला आनंद व्यक्त करतो. मला पुन्ह:पुन्हा तोच अभंग म्हणायचा आग्रह करतो. मीही त्याचा आग्रह मान्य करतो. ‘मलाही हा अभंग शिकव की रे मामा’ म्हणतो. मग मी त्याला अभंग शिकवू लागतो...त्याची मामी माझ्याकडे पाहत डोळे वटारते. पण मी तिकडे लक्ष न दिल्यासारखे करतो. मग तो माझा अभंग जोराने म्हणू लागतो...त्याची मामी त्याला रागे भरू लागते. हलकीशी एक चापट-पोळीही देते...तो हिरसमुसला होतो. कधीकधी रडतोही. माझ्याकडे रागाने पाहत कोप~यात उभा राहतो. तूच मामीकडून मला मार खायला लावलास, ही त्याच्या नजरेतली जळजळीत भावना! मी दुष्ट. मनातल्या मनात हसत राहतो. माझ्यावर रागावलेल्या कपिलला पाहून, त्याच्यावर रागावलेल्या त्याच्या मामीलाही पाहून...
पण अभ्र पांगून प्रकाश बरसायला फार वेळ लागत नाही.‘आता तुला एक मस्तपैकी कथा सांगतो हं, सांगू की नको?’ असं विचारलं की झालं!!
जेव्हा तो राहायला म्हणून माझ्याकडे प्रथमच आला तेव्हा माझ्या काँलेजची मे महिन्याची सुटी अजून संपायची होती. त्यामुळे त्यची शाळा सुटल्यानंतर मी त्याला रोज संध्याकाळी फिरायला म्हणून माळावर नेत असे. मधल्या वाटेने. अंगावर हिरवे , पिवळे पीक खेळवीत पहुडलेल्या शेताच्या बांधावरील पायवाटेवरून!!
पहिल्याच दिवशी त्याने मला हे झाड कशाचे, ते झाड कशाचे, या फुलाचे नाव काय, त्या फुलाचे नाव काय, या पानाचा असाच का रंग आहे,, त्या पानाचा तसाच का रंग, या शेताचे मालक कोण आहेत, तुझे शेत आहे की नाही- असे हज्जार प्रश्न करून हैराण हैरण करून सोडले...
sजेव्हा आम्ही शेताची सीमा ओलांडून माळाच्या सीमेत प्रवेश केला तेव्हा तर तो कपाळाला डावा आत लावून आश्चर्याने जवळजवळ ओरडलाच. म्हणाला,
‘आबाबाबाबाबाबाबाssss-’
‘काय झाले, रे?’
‘केवढा मोठ्ठा रे हा माळ, मामा!’ त्या माळापेक्षाही आपले डोळे मोठे करीत तो म्हणाला, ‘वाट्टेल तेवढया लांब दगड टाकावा बघ, कुणाच्याच घरावर पडणार नाही...होय की नाही?’
आता मात्र कपाळाला हात लावण्याची पाळी माझ्यावरच आली!
पण मी कपाळाला हात लावण्याआधीच त्याने माझ्याकडे आणखी एक प्रश्न टाकला, म्हणाला,
‘मामा, मी एक दगड फेकू?’
‘हो, फेक की!’ मी त्याच्या बालसुलभ प्रवृत्तीला हिरवा कंदिल दाखवला.
‘तसं नव्हे, नक्की फेकू काय?’
‘हो, नक्की-नक्की फेक!-’
‘नंतर रागवायचं नाही-
‘नाही-नाही!’
‘बघ-’
कारण इतकी मोठठी रिकामी जागा, त्यातही जनवस्ती नसलेली, तो पहिल्यांदाच पाहत होता ना!
‘पण मामा,’ त्याने ‘शहरी’ भीती व्यक्त केली, ‘मी जर दगड मारला आणि तो जर कुणाच्या घरावर जाऊन पडला - तर?’
‘पण इथं कुठं आहे घर जवळ दगड पडायला?’
‘ते बघ, ते बघ ते घर-’
त्याने एक फर्लांग अंतरावरची काळी कौलारू खोप दाखवली. मी म्हटले, ‘काही होत नाही, तू खुश्शाल फेक दगड हवे तितके-’
मी त्याला धैर्य दिले.
‘पण त्या घरावर जर दगड पडला आणि कौलं फुटली तर जबाबदार तू!’
गुन्ह्याअगोदरच त्याने मला कैद केले...
त्या संध्याकाळी त्याने कितीतरी दगड, लहान मोठे खडॆ असे समोर लांब आणि वर आकाशात मनसोक्त भिरकावले.. मी शेजारच्या बांधावरचे खडे-लहानलहान दगड त्याच्या पायाजवळ आणून ठेवत होतो आणि अंगातली सारी शक्ती एकवटून तो ते फेकत होता- एखाध्या धनुर्धारीने स्पर्धेचा सराव करावा, त्या असल्याप्रमाणे!
सूर्य बुडू लागला...
तरी पण त्याचा दगड फेकण्याचा खेळ संपेना.
सूर्य बुडाला. दिशा अंधारून आल्या. तरीही-
ªÀmमग मीच त्याचा मोठठा खडा फेकण्यासाठी वर केलेला हात वरच्यावर घट्ट पकडला आणि रागाने म्हणालो,
‘पुरे बाबा, आता! अंधार झाला, घराकडे परतूया-’
‘आता फक्त एकच मामा, फक्त एकच खडा-’
‘एक नाही आणि दोन नाही,’ मी थोडेसे उग्र रूप धारण केले, म्हणालो, ‘तिकडे मामी घरात दोघांच्याही नावाने खडे फोडत बसली असेल..’
त्या संध्याकाळी मी जवळ जवळ त्याला माळावरून ओढतच घरी नेले...
आता या दुनियेमधे जबाब देणा~या माणसांच्या संखेपेक्षा सवाल करणा~या माणसांचीच संख्या अधिक आहे, हे तर खरेच, शिवाय मोठया माणसांच्या तुलनेने ‘लहान माणसां’ चे सवाल अनंत आणि कधीही न संपणारे असतात, हेही खरे आहे. परंतु कपिलचे प्रश्न म्हणजे याच्याही पुढची एक पायरी! एक वेळ द्रौपदीची थाळी रिकामी होईल, पण त्याच्या मनातील प्रश्न संपणार नाहीत. एकेकदा तो असले विचित्र प्रश्न करतो- साक्षात यक्षाचाही चेहराही प्रश्चिन्हांकित व्हावा!
आता हेच पहा ना! चंद्राला चंद्रच का म्हणतात आणि सूर्याला सूर्यच का म्हणतात? चांदणे म्हणजे ऊन नव्हे आणि ऊन म्हणजे चांदणे नव्हे- असे का? गाय म्हणजे म्हैस का नाही आणि म्हैस म्हणजे गाय का नाही?....काय डोंबल उत्तर द्यायचे अशा प्रश्नांना?
...वास्तविक चंद्राला चंद्र म्हणतात, म्हणून चंद्रालाच चंद्र म्हणतात किंवा म्हैशीला गाय म्हणत नाहीत म्हणूनच म्हैशीला म्हैस म्हणतात- हेच अशा प्रश्नांचे उत्तर!
पण नाही. त्याचे एवढया उत्तरावर समाधान होत नाही. त्याच्या प्रश्नरूपी चेह~याला आणखी काही तरी पाहिजे असते...
त्याची जिज्ञासूवृत्तीही तितकीच भयानक आहे. अगदी सुरुवातीला मला त्याच्या या जिज्ञासूवृत्तीचे आणि प्रश्नप्रवृत्तीचे कौतुक वाटायचे. कारण आजकाल, विशेषत: त्याच्या वयोगटातील मुलांमध्ये, अभावानेच आढळणा~या या वृत्ती आहेत, असे माझे प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्या त्या वृत्तीला जोपासण्याच्या आणि वाढविण्याच्या हेतूने मी त्याच्या प्रत्येक शंकेला, प्रश्नाला तो समाधानी होईल, अशा पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो....कधी त्याचे समाधान होते, कधी होत नाही, कधी कधी तर मीच थिटा पडतो त्याला उत्तर देताना!
बरे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नाही, माहीत नाही, असे म्हणण्याचीही सोय नाही. करण लगेच त्याचा प्रश्न तयार असतो-‘या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही म्हणजे असला कसला रे तू एम. ए. झालास?’ एम. ए. झालेला माणूस आणि सर्वज्ञानी परमेश्वर या दोहोंमध्ये त्याच्या दृष्टीने काहीच फरक नव्ह्ता!
एकदा त्याने मला विचारले, ‘मामा, क~हाड म्हणजे काय?’
मी उत्तर दिले, ‘ते एका गावाचे नाव आहे, का?’
‘पण कहाडच का नाव आहे?’
“ मला माहित नाही.”
‘एवढं सोप्प्प्प्पं आहे आणि तुला माहित नाही!”
“ होय.” मी शरणागतीचे हात वर केले.
“मी सांगू?”
“सांग!”
“ अरे, तिथे सगळ्या कु~हाडीच आहेत रे!”
मला ‘क~हाड’ या शब्दाची व्युत्पत्ती माहीत नाही. पण ‘क~हाड’ या शब्दाचे मूळ ‘कु~हाडी’ त शोधणा~या त्याच्या कल्पकतेकडे मी पाहातच राहिलो.
तर असा हा कपिल. एकामागून एक नारळ वाढवावेत त्याप्रमाणे कुठल्याही शब्दाची ‘इटिमाँलाँजी’ तो अशी फटाफट फोडतो...
कोणत्याही लहान मुलाप्रमाणे कपिललाही कथा ऎकायला फार आवडतात. पण यात काही विशेष नाही. ‘कथा’ या सदराखाली काय वाट्टेल ते जुळवून सांगितले,ठोकले, तरी तिचा तो आनंदाने स्वीकार करतो...
पण आंधळा स्वीकार करत नाही. मुख्य म्हणजे तो कथा लक्ष देवून नीट ऎकत असतो. कथाकथनकाराने विसरलेला एखादा संदर्भ, दुवा तो ‘आँन दी स्पाँट’ कथाकथनकाराच्या ध्यानात आणून देतो. कथानकात राहिलेले ‘कच्चे धागे’ तो अचूक पकडतो आणि निदर्शनास आणून देतो. एखादी अवघड कविता शिस्तीत, व्यवस्थित समजावून घ्यावी त्याप्रमाणे तो कथा समजावून घेतो. कथा सांगणा~याची तो कोणतीही हातचलाखी वा लपवाछपवी खपवून घेत नाही. मग त्या ‘कथे’ त काही तथ्य असो वा नसो!
त्याच्या मनावर काही संस्कार व्हावेत, कथा ऎकण्याची गोडी आहेच, पण कथा सांगण्याचीही गोडी त्याच्या मनात निर्माण व्हावी, म्हणून गाण्याप्रमाणेच आमचा ‘कथाकथना’ चाही कार्यक्रम ठरून गेला आहे.
वेळ: रात्रीच्या जेवणाची.
स्थळ: स्वयंपाकघराचा ‘वरचा कट्टा’.
कथाकथनकाराची भूमिका कधी माझ्याकडे तर कधी त्याच्या मामीकडे. कधी कधी आम्ही सांगितलेली कथा त्यालाच पुनश्च सांगायला लावतो. पण त्यात काही त्याने अजून विशेष रस घेतलेला दिसत नाही. पण श्रवणभक्ती मात्र अगदी दृष्ट लागण्यासारखी, काढण्यासारखीही!
कपिलच्या मामीने सांगितलेला जी.एं. चा ‘खुळा बाळ्या’ त्याला जाम आवडला. त्यांचीच ‘शेपटी’ची कथाही त्याला खूप आवडली. परंतु त्याची हंसून हंसून खरी मुरकुंडी वळली ती त्यांच्याच ‘लांब नाकाच्या गोष्टी’ ने! त्या कथेतल्या राजकन्येचे नाक वाढत वाढत जावून दूरवरच्या एका डोंगरावर टेकते किंवा राजकन्या ‘नाही’, ‘नाही’ अशा अर्थाने मान हलविते व तिचे नाक पाहावयास आलेल्या दरबारी मंडळींतील काही मंडळी पायात जाड दोरी अडकल्याप्रमाणे तिचे वाढलेले, वाढत जाणारे नाक अडकून एकमेकांच्या अंगावर धपाधपा पडतात- हा प्रसंग ऎकताना तर त्याचे हंसणे इतके अनावर झाले, की तो पानावरूनच उठला!
कितीतरी वेळा त्याने मला हीच कथा सांगायला लावली आहे आणि मीही ती सांगितली आहे...
पण एकदा मात्र त्याने मला त्या कथेवरची आपली एक शंका विचारली आणि हाता-पायाची मिळून अख्खी वीसच्या वीस बोटे तोंडात घालण्याची पाळी माझ्यावर कोसळली! आपले गळके नाक पुसत पुसत त्याने प्रश्न केला होता- ‘ मामा, त्या राजकन्येचे नाक इतके लांब होते म्हणतोस, तर ती शेंबूड कसा काढत होती रे?’
मी मनोमनीं त्याच दिवशी ठरवून टाकले:
कपिलला घेऊन मुद्दाम धारवाडला जायचे. तेही लवकरात लवकर! तो मोठा व्हायच्या आत! कारण त्याच्या प्रश्नाचे उत्तर फक्त जी.ए. च देवू शकतील...