सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

कोणत्याही लहान मुलाप्रमाणे कपिललाही कथा ऎकायला फार आवडतात. पण यात काही विशेष नाही. ‘कथा’ या सदराखाली काय वाट्टेल ते जुळवून सांगितले,ठोकले, तरी तिचा तो आनंदाने स्वीकार करतो...
पण आंधळा स्वीकार करत नाही. मुख्य म्हणजे तो कथा लक्ष देवून नीट ऎकत असतो. कथाकथनकाराने विसरलेला एखादा संदर्भ, दुवा तो ‘आँन दी स्पाँट’ कथाकथनकाराच्या ध्यानात आणून देतो. कथानकात राहिलेले ‘कच्चे धागे’ तो अचूक पकडतो आणि निदर्शनास आणून देतो. एखादी अवघड कविता शिस्तीत, व्यवस्थित समजावून घ्यावी त्याप्रमाणे तो कथा समजावून घेतो. कथा सांगणा~याची तो कोणतीही हातचलाखी वा लपवाछपवी खपवून घेत नाही. मग त्या ‘कथे’ त काही तथ्य असो वा नसो!
त्याच्या मनावर काही संस्कार व्हावेत, कथा ऎकण्याची गोडी आहेच, पण कथा सांगण्याचीही गोडी त्याच्या मनात निर्माण व्हावी, म्हणून गाण्याप्रमाणेच आमचा ‘कथाकथना’ चाही कार्यक्रम ठरून गेला आहे.
वेळ: रात्रीच्या जेवणाची.
स्थळ: स्वयंपाकघराचा ‘वरचा कट्टा’.
कथाकथनकाराची भूमिका कधी माझ्याकडे तर कधी त्याच्या मामीकडे. कधी कधी आम्ही सांगितलेली कथा त्यालाच पुनश्च सांगायला लावतो. पण त्यात काही त्याने अजून विशेष रस घेतलेला दिसत नाही. पण श्रवणभक्ती मात्र अगदी दृष्ट लागण्यासारखी, काढण्यासारखीही!
कपिलच्या मामीने सांगितलेला जी.एं. चा ‘खुळा बाळ्या’ त्याला जाम आवडला. त्यांचीच ‘शेपटी’ची कथाही त्याला खूप आवडली. परंतु त्याची हंसून हंसून खरी मुरकुंडी वळली ती त्यांच्याच ‘लांब नाकाच्या गोष्टी’ ने! त्या कथेतल्या राजकन्येचे नाक वाढत वाढत जावून दूरवरच्या एका डोंगरावर टेकते किंवा राजकन्या ‘नाही’, ‘नाही’ अशा अर्थाने मान हलविते व तिचे नाक पाहावयास आलेल्या दरबारी मंडळींतील काही मंडळी पायात जाड दोरी अडकल्याप्रमाणे तिचे वाढलेले, वाढत जाणारे नाक अडकून एकमेकांच्या अंगावर धपाधपा पडतात- हा प्रसंग ऎकताना तर त्याचे हंसणे इतके अनावर झाले, की तो पानावरूनच उठला!
कितीतरी वेळा त्याने मला हीच कथा सांगायला लावली आहे आणि मीही ती सांगितली आहे...
पण एकदा मात्र त्याने मला त्या कथेवरची आपली एक शंका विचारली आणि हाता-पायाची मिळून अख्खी वीसच्या वीस बोटे तोंडात घालण्याची पाळी माझ्यावर कोसळली! आपले गळके नाक पुसत पुसत त्याने प्रश्न केला होता- ‘ मामा, त्या राजकन्येचे नाक इतके लांब होते म्हणतोस, तर ती शेंबूड कसा काढत होती रे?’
मी मनोमनीं त्याच दिवशी ठरवून टाकले:
कपिलला घेऊन मुद्दाम धारवाडला जायचे. तेही लवकरात लवकर! तो मोठा व्हायच्या आत! कारण त्याच्या प्रश्नाचे उत्तर फक्त जी.ए. च देवू शकतील...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा