सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

आपलेही नाव वर्तमानपत्रात, मासिकात छापून यावे, असे कपिलला फार वाटते. एखाद्या पेपरमध्ये किंवा मासिका-साप्ताहिकात माझे नाव छापून आलेले दिसले रे दिसले, की तो डोळे व मान उडवीत म्हणतो, ‘मग काय मामा, जोर आहे तुझा! तू तर एकदम जगप्रसिद्धच झालास की रे!’
नाव छापून आले, की त्याच्यादृष्टीने ती व्यक्ती जगप्रसिद्ध झालीच!
एकदा त्याने मला विचारले, ‘मामा, तुझे नाव त्यांना कसे काय रे, माहीत असते?’
‘अरे, त्यांना माहीत नसते,’ मी त्याला माहिती पुरविली. ‘आपणच ते कळवायचे असते. आपण कथा किंवा कविता लिहायची. त्या कथेखाली किंवा कवितेखाली आपले नाव लिहायचे, आणि ती कथा किंवा कविता पाकिटात घालून पोष्टाने पाठवून द्यायची त्यांच्याकडे. आपली कथा-कविता जर त्यांना आवडली तर ते ती छापतात आणि खाली आपले नावही छापतात!’
‘ते तुझ्याकडून पैसे घेतात त्यासाठी?’ त्याने अत्यंत हलक्या आवाजात प्रश्न केला.
त्याचेही बरोबरच होते म्हणा! कारण लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका वगैरे छापण्यासाठी छापणारे लोक पैसे घेतात, हे त्याने आपल्या मुंजीत पाहिले होते. त्यामुळे त्याची अशी भावना झाली होती. पण त्याच्या मनातून ती भावना पुसून टाकत, छाती फुगवून मी म्हणालो,
‘छे!छे!-उलट तेच आपल्याला पैसे देतात-मानधन म्हणून!’
‘आपल्याला पैसे देतात?’ त्याच्या बोलण्यात आश्चर्य तर होतेच, पण त्याहीपेक्षा अधिक होता तो अविश्वास-माझ्यावरचा!
थोडया वेळाने त्याने मला प्रश्न केला, ‘पण मामा, माझे नाव का छापून येत नाही?’
‘तूही कथा-कविता लिही की!’ त्याला मी ‘प्रोसिजर’ सांगू लागलो, ‘तुला काय लिहावेसे वाटते ते लिही. आपण ते पोष्टाने पाठून देऊया. त्यांना आवडली तर ते ती छापतील, खाली नावही छापतील तुझे आणि नंतर मानधन म्हणून पैसेही पाठवून देतील मनिआँर्डरीने तुझ्या नावावर!’
त्याला माझे म्हणणे पूर्ण पटले. पण लगेच चिंताक्रांत होऊन तो म्हणाला, ‘पण मामा, मला कशी लिहिता येणार रे, तुझ्यासारखी कथा-कविता! तू केवढा मोठठा-मी केवढासा!’
‘अरे, आपण प्रयत्न करायचा रे-प्रयत्न केला की सारे येते, होय की नाही?’
‘तेही खरंच म्हणा!’ अशा आशयाची त्याने मान हलविली.
पुढे केव्हातरी माझ्या हातावर वहीच्या पानाची एक घडी ठेवत तो म्हणाला,
‘मामा, मी दोन कविता लिहिल्या आहेत बघ! पेपरला पाठवून देऊया?’
मला आनंद झाला. मोठ्ठ्या कौतुकाने मी त्याने दिलेली कागदाची घडी उघडली आणि त्याची कविता वाचू लागलो...आणि-आणि मला दोन हजार व्होल्टेजचा धक्काच बसला!
कारण त्याच्या म्हणून त्याने लिहिलेल्या त्या दोन कविता म्हणजे आच्छादित साहित्यिक ‘चौर्य’ नव्हते, तर दिवसाढवळ्या टाकलेला तो धडधडीत ‘दरोडा’ होता! दोन्ही कविता पाचवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील होत्या! पहिली होती इंदिरा संतांची आणि दुसरी होती कविवर्य कृ. ब. निकुंब यांची!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा