सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

तर असा हा कपिल म्हणजे माझा भाचा – म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा! गोरा,गोरापान. तरतरीत. टपोरे डोळे. वेधक चेहरा. संपूर्ण नाव कपिल धुंडीराज कुलकर्णी. वय वर्षे आठ. इयत्ता तिसरी. हुषार. लाघवी. जिज्ञासू. विचक्षण. वगैरे. वगैरे.
कपिलला गाण्याची मनस्वी आवड आहे. सुरुवाती-सुरुवातीला तो हिंदी सिनेमातील उडत्या आणि भडक चालीतील गाणी आपली पिटुकली कंबर हलवीत तल्लीन होऊन म्हणत असे. पण जेव्हा तो जिल्ह्याचे गाव सोडून माझ्याकडे राहायला आला- म्हणजे मीच त्याला माझ्या गावाकडे घेऊन आलो- तेव्हापासून त्याची ‘टेस्ट’ बदलली. कदाचित माझ्या धाकामुळे असेल, कदाचित हिच्या, अथवा दोघांच्याही... पण आता त्याला मराठी भावगीते, भक्तिगीते, बालगीते, आवडू लागली आहेत. म्हणतोही छान. म्हणजे ‘षडज’ न सोडता. सुरात. लयीत. तालात. आणि हा ताल तो कधी अँल्युमिनियमच्या डब्यावर, डब्याच्या झाकणावर धरतो तर कधी आपल्या गुडघ्यांवर धरतो...आवाज खणखणीत. उच्चार स्पष्ट. स्वच्छ.
पंचांग आणि ‘वैद्या’ प्रमाणे हार्मोनियमही घरचाच....पण तरीही आमच्या गाणे म्हणण्याच्या व त्याला गाणे शिकविण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तासभर. आणि सुटीच्या दिवशी तर जवळजवळ दिवसभरच... परंतु लहर लागली, की तो माझ्या माडीवरच्या खोलीत येतो, आणि आपल्याच तंद्रीत गाणे सुरू करतो.
मी कामात असेन तर त्याला रागावून चूप करतो. माझा मूड असेल तर क्वचित माझ्यातला ‘केशवकुमार’ जागा होतो....
एकदा रात्रीच्या वेळी आमची मैफिल रंगली होती. मधल्या वाडयातले सुरेशराव पंतांची भजने म्हणत होते. त्यांच्या शेजारीच मांडी घालून बसलेला कपिल देहाचा कान आणि मांडीचा तबला करून ऎकत होता....
सुरेशरावांनी मध्यंतर घेतला आणि तेवढयात कपिलने त्यांना ‘आपली आवड’ बोलून दाखवली. माझ्याकडे मान वर करून बघत म्हणाला, ‘ मामा, ते हे गाणे म्हणायला सांग की रे सुरेशमामांना...’
‘कोणते?’ पेटी थांबवून मी प्रश्न केला.
‘ ते, हे रे-’
त्याला ते नेमके गाणे सांगता येईना. ‘अं ssss’ असे करीत, डोळे बारीक करून तो गाण्याचे शब्द आठवू लागला....
मग मी त्याला, त्याला येत असलेली, माहीत असलेली, आवडत असलेली काही गाणी विचारली. पण प्रत्येक गाण्याला त्याने ‘ते नव्हे रे-’, ‘अंह-’ अशी उत्तरे दिली...
आम्ही सगळे विचार करू लागलो. परंतु त्याला नेमके कोणते गाणे अभिप्रेत होते, ते काही समजेना. मी त्याला विचारले, ‘ शब्द कोणते आहेत, ते तरी सांग बघू त्या गाण्यातले?’
‘ते हे रे-’ चेहरा गंभीर करून तो सांगू लागला, ‘ आरशावरती रावण उडला-’
‘आरशावरती रावण उडला’ असे त्याने म्हटल्याबरोबर मी, ही, सुरेशराव, पलीकडच्या घरातला विजू, मेधा - आम्ही सर्वजन खळ्ळ्कन हंसू लागलो...
आमचे ते हसणे त्याला आपला अपमान वाटला. तो चिडला. रागाला आला. रागाने चेहरा-डोळे चित्रचिचित्र करू लागला....
-शेवटी खूप मंथन केल्यानंतर समजले ते हे, की त्याला हवे असलेले गाणे म्हणजे अरुण दाते यांचे ‘भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी’ हे होते आणि ‘अर्ध्यावरती डाव मोडिला’ चे त्याने ‘आरशावरती रावण उडला’ असे केले होते!

1 टिप्पणी: