सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

रोज माझे काँलेज दुपारी दीड वाजता सुटते आणि शेतातून गेलेल्या मधल्या पायवाटेने घरी पोहोंचायला मला साधारणपणे पावणे दोन होतात.
पण त्या दिवशी मी जेव्हा घरी आलो तेव्हा बरोबर सव्वा अकरा वाजून गेले होते. ‘मुंबई - ब’ वरचा कामगार कार्यक्रम संपत आला होता.
‘आज लौकर मास्तर?’ पागेत राहणा~या येसूकाकांनी विचारणा केली.
‘होय, शेख अब्दुलाह गेले ना, त्यासाठी...’ मी खुलासा केला.
जिन्याखालच्या कोप~यात चपला सरकावून मी माडीवर गेलो. कपिल माडीवरच होता. भिंतीकडे तोंड करून उभा. शांत. चूप. थोडासा गंभीरही.
माझ्या आगमनाची त्याने यथायथाच दखल घेतली.
मला आश्चर्य वाटले! कारण रोज असे होत नसे. जरी त्याच्या शाळेची आणि माझ्या शाळेची सुरू होण्याची आणि सुटण्याची वेळ जरी परस्पर विरुद्ध असली तरी जेव्हा जेव्हा आम्हा दोघांच्या गाठी-भेटी होत, तेव्हा तेव्हा त्याची मनस्थिती उत्फुल्ल असे. त्याच्या अथवा माझ्या एखादी ‘गंमत’ म्हणून सांगण्याने, त्याच्या एखाद्या प्रश्नाने, शंकेने आमच्या संभाषणाला सुरुवात होत असे. कधी कधी शाळेतील मित्रमंडळींच्या तक्रारीही तो मांडे. आज बाईंनी शाळेत कोणती कविता शिकविली, कोणता धडा घेतला, किंवा आज बाईंनी घरात जुन्या कपडयांवर कोणती वस्तू घेतली अथवा गावात चावडीजवळ कोणत्या पक्षाची गाडी अडवली गेली -असेही विषय बोलण्याचे प्रारंभ असत. घरात पाय ठेवल्याबरोबर काहीतरी सांगण्यासाठी वा विचारण्यासाठी म्हणून दूध मागणा~या मांजरीच्या बालपिलाप्रमाणे तो माझ्याभोवती घोटाळत असे...
पण आज मात्र यांपैकी काहीच घडले नव्हते. मी विचार केला: बहुतेक मामीशीच स्वारीचे काहीतरी बिनसलेले असावे!
अंगावरचे कपडे काढता काढता, त्याची कोमजलेली कळी खुलविण्यासाठी म्हणून मला आश्चर्य वाटल्याच्या आवाजात मी प्रश्न केला,
‘अरे? तू आज शाळेला गेला नाहीस?’
‘गेलो होतो’ अत्यंत पडेल आवाजात त्याने उत्तर दिले.‘ पण बाईंनी आज सुटी दिली..’
‘सुट्ट्ट्ट्टी?’ सात मजली चकित झाल्याच्या आविर्भावात मी त्याला पुन्हा प्रश्न केला,‘ का? आज का बाबा सुट्टी?’
डोळे बारीक करून, त्याच्या डोळ्यात खोल पाहत गंभीरपणे विचार करीत असल्याचा मी बहाणा करू लागलो. कारण मला त्याच्या चेह~याचा पोच काढायचा होता!
‘ते कोण आहेत की रे ते,’ हळूहळू त्याचे ओठ सैल होऊ लागले, ‘त्यांचे निधन झाले म्हणे!’
आपल्या उत्तरात त्याने ‘निधन’ हा शब्द वापरल्यामुळे मला त्याचे विशेष कौतुक वाटून गेले. पण एवढयवरच खूष न होता मी लगेच ‘पेडगाव’ च्या गाडीत बसलो.
‘निधन? निधन म्हणजे काय बुवा!’
‘निधन म्हणजे काय ते तुला माहीत नाही? एवढा मोठ्ठा झालास आणि...’
‘थु: तुझ्या मारी’ च्या टोनमध्ये त्याने मलाच पण चिडून प्रतिप्रश्न केला.
मला बरे वाटले. कारण आता त्याच्या चेह~यावरील अपेक्षित बदलांना सुरुवात होत होती.
‘नाही- निधन म्हणजे...काय बरं ssss’ मी पेडगावच्या स्तँडवर उतरलो.
तो चिडक्या आवाजात म्हणाला, ‘ निधन म्हणजे वारले रे...’
‘हां-हां! आत्ता लक्ष्यात आले-पण कुणाचे?’
माझ्या गोंधळलेल्या चेह~याकडे पाहून तोही गोंधळला. विचार करू लागला. आठवण्याचा प्रयत्न करू लागला....त्याचा चेहरा पालटू लागला...डोळ्यांचे आकुंचन-प्रसरण होऊ लागले. ऒठ थरथरू लागले. पण शब्द काही फुटेनात!
असाच काही वेळ गेला. आणि त्याचे डोळे एकदम चमकले. त्याला काहीतरी आठवले. त्याला जे काही आठवले होते ते त्याच्या तोंडातून अस्पष्टसे उमटू लागले-
‘ ते,हे रे, ते ssss- काश्मिर, काश्मिरचे...’
आणि तो तिथेच अडकू लागला. त्याच्या जिभेची ‘पिन’ काही पुढे सरकेना. काही केल्या त्याला ‘शेख अब्दुल्लाह’ हे नाव काही आठवेना...
अर्थात माझीही त्याच्याकडून ती अपेक्षा नव्हतीच. कारण आतापर्यंत त्याने जे सांगितले होते, आणि मुख्य म्हणजे ज्या पद्धतीने सांगितले होते, तेच त्याच्या वयाच्या मानाने भरपूर होते.
मग मी त्याला, तेवढीच त्याच्या सामान्यज्ञानात भर, या भावनेने, अगदी थोडक्यात काश्मिरबद्दल सांगितले. त्याने लक्षपूर्वक मी सांगितलेले ऎकले आणि हळूहळू त्याच्या ओठांना शब्दांचा मोहर सुटला व सर्वत्र प्रश्नगंध दरवळू लागला... काश्मिर म्हणजे काय, ते कुठे आहे, त्याचे नाव काश्मिरच का आहे, तिथेही शाळा आहे काय,
आमच्यासारख्या नंदाबाई आहेत काय, तिथे सारखे बर्फ का पडते, तिथल्या मुलांना रोज बर्फाचे ‘आयस्क्रिम’ खायला मिळते काय, आपण काश्मिरला केव्हा जायचे, काश्मिरला जहाज का जात नाही, आणि आपण जर नेले, तर काय होते-वगैरे.वगैरे.
पाकळीपाकळीने फूल उमलावे तसा तो हळूहळू उमलू लागला...
लुंगी गुंडाळताना ‘मग काय, चैन आहे बाबा तुझी!’ अशा आशयाने मान व डोळे उडवित मी त्याला विचारले,
‘मग काय बाबा, मजा आहे तुझी! आज सुट्टी !’
माझ्या प्रश्नाने त्याचा चेहरा खर्कन उतरला. तो पूर्ववत गंभीर झाला. रागमिश्रित चिडक्या चेह~याने व एखाद्याची समजूत काढल्याप्रमाणे तो मला म्हणाला आणि मी चाटच पडलो! तो म्हणाला,
‘ सुट्टी आहे, खरं ती काही हसायची सुट्टी नाही, बाबा!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा