सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

एकदा तिन्हीसांजेला जुन्या वाडयातल्या मालूकाकी घरी आल्या होत्या. मालूकाकी आल्या आणि चुलीपुढे भाक~या करीत बसलेल्या हिच्यापुढे बोलत बसल्या...
कपिल देवापुढे बसून रोजच्याप्रमाणे संध्या करीत होता. मी त्याच्यामागे पण काही अंतरावर पोते टाकून कसला तरी हिशोब करीत बसलो होतो.
कपिलने आपली संध्या आटोपली. ताम्हणातले पाणी अंगणातल्या तुळशीकट्ट्यात टाकून तो पुन्हा देवासमोर येऊन बसला. आणि छातीला हात जोडून खडया आवाजात ‘शुभंकरोति’ म्हणू लागला...
‘शुभंकरोति’ झाली, ‘कृष्ण म्हणे मातेला...’, ‘कुमकुममंडित जनके...’, ‘तू सागर करुणेचा..’, ‘गरुड जसा गगनातुनि...’ अशा त्याच्या आजोबांनी त्याला शिकविलेल्या मोरोपंतांच्या आर्याही झाल्या....
मग त्याने रामरक्षा सुरू केली...
काही वेळाने मला जाणवू लागले, की त्याच्या आवाजाचा ‘व्हाल्यूम’ कमी कमी होऊ लागला आहे. रामरक्षेकडे त्याचे लक्ष नाहीय. पेंगुळलेल्या विद्यार्थ्याने जांभई देत पाढे म्हणावेत त्याप्रमाणे एकच श्लोक तो दोन-दोन, तीन-तीन वेळा म्हणतोय. म्हणताना काही श्लोक तो एकदम पुढे तरी जातोय किंवा मागे तरी येतोय.....
रोज खणखणीत खडगाच्या आवाजात रामरक्षा म्हणणा~या आज याला काय झाले, असा मनात विचार येऊन मी त्याच्याकडे पाहिले...
तर महाराजांचे सगळे लक्ष चुलीकडे होते. डोळे विस्फारित करून व कान मांजरासारखे टवकारून तो मालूकाकींकडे पाहत होता. त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऎकत होता...
मालूकाकी गावात नुक्त्याच कुठे कुठे झालेल्या चो~यांबद्दल बोलत होत्या...
‘कपिल,’ मी त्याला भानावर आणत म्हणालो, ‘ कुठे आहे तुझे लक्ष?’
मग तो नीट बसला. पुन्हा पूर्वीसारखे हात जोडून समोर पाहत रामरक्षेचे पुढचे श्लोक म्हणू लागला...
जेवणे झाल्यावर अंथरूण घालण्यासाठी म्हणून मी माडीवर जाणार तेवढयात तो गयावया केल्याप्रमाणे म्हणाला,
‘मामा, मामा, एक चित्र काढून दे की रे मला!-’
‘आत्ता? आत्ता नाही बाबा! माझा अभ्यास आहे. उद्या काढून देतो- हं?’
‘जा, बाबा-’ त्याचे तोंड चिमणीच्या पिलाएवढे झाले!!
कपिलची आणि माझी राश एकच असल्यामुळे असेल कदाचित, पण कोणत्याही कारणासाठी त्याला नाराज करणे, त्याचे हिरमुसले रूपडे पाहणे माझ्या जिवावर येते. मी त्यच्यावरच इतका का जीव टाकतो आणि तोही ‘मामा’, ‘मामा’ करीत माझ्याच मागे का लागतो, हे मला अजून समजलेले नाहीय!
ही जेवायला बसायची होती. म्हटले, हिचे जेवण आटोपून, उष्ट-शेण होईपर्यंत त्याला एखादे चित्र काढून द्यावे. मग मी फळीवरच्या डब्यातील खडूचा एक तुकडा घेतला आणि जमिनीवर बसत त्याला विचारले,
‘हं- सांग! कुणाचे चित्र काढू? बैलाचे काढू?’
‘नको-“
‘मग घोडयाचे काढतो, मस्तपैकी! हं?’
‘घोडयाचे ssss’ त्याने काही क्षण विचार केला आणि लगेच म्हणाला,‘ नको-नको! घोडयाचे नको.’
‘मग कुणाचे काढू? तूच सांग!’
मी त्याच्या उत्तराकडे पाहू लागलो. खूप विचार करून बोलल्याप्रमाणे तो म्हणाला, ‘पोलिसाचं काढ!’
मग मी जमिनीवर एका पोलिसाचे चित्र काढले. पण त्या पोलिसाचे हात रिक्त राहून गेल्याचे पाहून तो म्हणाला,‘अरे, याच्या हातामध्ये पिस्तूल दे की रे, मामा! काय बाबा तू...’
मग मी पोलिसाच्या हातात एक पिस्तूल दिले.
‘आता एक चोर पळतोय असं काढ.’
मग मी पळणारा चोर काढला. एवढेच नव्हे तर त्या पोलिसाच्या हातातील पिस्तुलातून तीन-चार गोळ्या पळणा~या चोराच्या दिशेने मीच उडवल्या..
चित्र पाहून, त्यातही चोर पोलिसाला घाबरून पळतो आहे, हे पाहून तो खूष खूष होऊन गेला. टाळ्या पिटत, उडया मारीत आनंदाने नाचू लागला...
पण मध्येच एकदम गंभीर होऊन त्याने काळजीच्या सुरात विचारले,
‘मामा, आता आपल्या घरी चोर येणार नाहीत ना?’
‘अजिबात नाही!’ मी ठामपणे त्याला सांगितले. हो, उगीच रात्रीअपरात्री घाबरून उठायचा. त्यात पुन्हा मालूकाकींनी तासाभरापूर्वीच सांगितलेल्या च्रोरांच्या हकीकती.
‘पण का येणार नाहीत चोर आपल्या घरी?’
त्याला माझ्याकडून आणखी ‘सेक्युरिटी’ हवी असलेली दिसली. म्हणालो, ‘अरे, हा पोलिस आहे की! ’
‘आणि आले तर?’
‘तर-तर, हा पोलिस त्या चोरांना या चोरासारखे पळवून लावील.’
माझ्या उत्तराने त्याचा चेहरा एकदम निश्चिंत झाला...
कितीतरी वेळा तो त्या चित्राकडे टक लावून पाहत होता.चित्र पाहत असताना त्याच्या चेह~यावर नाना भाव तरळून जात होते. चिमणीच्या प्रकाशातही मला ते स्पष्ट जाणवत होते. पळणा~या चोराला गोळी लागली आहे की नाही, की नुसतीच चाटून गेली अहे, हेही तो पाहत असावा!
दुपारीच स्वच्छ सारविलेली जमीन अस्वच्छ केल्याबद्दल दोघांवरही रागावलेली त्याची मामी जेव्हा ते चित्र फडक्याने पुसू लागली तेव्हा तर त्याने ‘भो ssss’ करून भोकांडच पसरले. काही म्हणजे काही केल्या तो तिला ते चित्र पुसू देईना....चित्र पुसून टाकले आणि रात्री चोर आले तर? मग गोळ्या कोण झाडणार? आपण तर माडीवर असणार..तेही झोपेत! यासारखे तो प्रश्न करू लागला. त्याने चित्र पुसू पाहणारे हिचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले...
शेवटी ‘मामा-भाचे काय वाट्टेल ते हाका मारा’ असे पुटपुटत ही माडीवर निघून गेली...
राहून राहून मला कपिलच्या भोळ्या-भाबडया श्रद्धेचे हंसू येत होते...
बाकी त्याला तरी हंसण्याचे काय कारण आहे म्हणा! कारण आपणही त्याच्यासारखेच आहोत नाही का? फक्त चौकटीतले चित्र तेवढे बदलायचे! पोलिसाऎवजी राम-कृष्ण-महादेव-मारुती किंवा लक्ष्मी-विठोबा-विष्णू-गणपती!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा