सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

‘माझे माहेर पंढरी’ हा कपिलचा परमप्रिय अभंग. ‘पंढरी ssss ’ असा त्याने तार षडजावर अभंग संपवला, आणि तेव्हा जर ‘ही’ समोर असेल तर मला तिची चेष्टा करण्याची लहर येते... मग मी माझा अभंग सुरू करतो. तो लगेच मांडी घालून, मानेला हिसके देत ताल धरतो. अभंगाची पहिली ओळ उत्स्फूर्त येते. मग मात्र दरेक चरणाला पाच-एक सेकंद विचार करून माझा अभंग तयार होतो... अभंग तयार होतो म्हणजे फक्त यमकांची खटपट-शब्दांची जुळवाजुळव! ...
तबला वजवता वाजवता तोही रंगून जातो. अभंग गाता गाता मीही तल्लीन होऊन जातो!-
‘माझे माहेर कोल्हापूरी । आहे पंचगंगा तीरी॥१॥
माझी बहीण विजूताई। तिची सदा गडबड घाई॥२॥
बंडोपंत आहे बंधू । त्याची छाती काय सांगू॥३।
जनता जनार्दनी शरण । करी आहेरची आठवण॥४॥’
अभंग संपतो. कपिलला तो फार आवडतो. कारण त्यात त्याच्या मामीची चेष्टा असते ना! टाळ्या पिटून, ‘होssss’ असा आवाज काढून, मामीकडे पाहत तो आपला आनंद व्यक्त करतो. मला पुन्ह:पुन्हा तोच अभंग म्हणायचा आग्रह करतो. मीही त्याचा आग्रह मान्य करतो. ‘मलाही हा अभंग शिकव की रे मामा’ म्हणतो. मग मी त्याला अभंग शिकवू लागतो...त्याची मामी माझ्याकडे पाहत डोळे वटारते. पण मी तिकडे लक्ष न दिल्यासारखे करतो. मग तो माझा अभंग जोराने म्हणू लागतो...त्याची मामी त्याला रागे भरू लागते. हलकीशी एक चापट-पोळीही देते...तो हिरसमुसला होतो. कधीकधी रडतोही. माझ्याकडे रागाने पाहत कोप~यात उभा राहतो. तूच मामीकडून मला मार खायला लावलास, ही त्याच्या नजरेतली जळजळीत भावना! मी दुष्ट. मनातल्या मनात हसत राहतो. माझ्यावर रागावलेल्या कपिलला पाहून, त्याच्यावर रागावलेल्या त्याच्या मामीलाही पाहून...
पण अभ्र पांगून प्रकाश बरसायला फार वेळ लागत नाही.‘आता तुला एक मस्तपैकी कथा सांगतो हं, सांगू की नको?’ असं विचारलं की झालं!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा