सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

तर असा हा कपिल!
फारा वर्षांपूर्वी खांडेकरांच्या ‘सुलू’ ने मला सांगितले होते,
सांगितले होते, की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात किमान एक तरी कादंबरी लिहू शकेल.
कारण प्रत्येकाचे आयुष्य हीच एक कादंबरी असते!
खरे आहे ते!
ते खरे आहे, आणि हेही खरे आहे, की प्रत्येक माणसाप्रमाणे प्रत्येक लहान मुलाचे आयुष्यही कादंबरीसारखेच असते!
केवळ कादंबरी नव्हे, तर महाकाव्य!
काही मासांच्याच सहवासात कपिलने मला हे जाणवून दिले आहे!
तर असा हा कपिल. तो जसा गुणी आहे, हुषार आहे, कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे तसाच तो हट्टीही आहे, तापट आहे, संतापी- चिडखोरही आहे!
आणि मी? मीही त्याच्यासारखाच-तापट, हेकट, रागीट!
म्हणूनच कदाचित आमचे षडज-पंचम जुळत असावेत!
नाही असे नाही, कधी कधी आम्हा उभयतांमध्ये बेसूर निर्माण होतो. तारा नको तशा चढतात-उतरतात!
मग मी त्याच्यावर डोळे वटारतो. अनावर होऊन रागे भरतो. म्हणतो-
‘जा, जा तू तुझ्या आईच्या घरी परत! एक क्षणभरही राहू नकोस माझ्या घरात- माझ्या गावात!!’
पण अशावेळी तो उलट बोलत नाही.
माझ्याकडे पाहत नाही...
सरळ उठतो. कोप~यात अडकविलेले शाळेचे दप्तर मुकाटयाने उचलतो.. आपले दिसतील ते कपडे त्यात भरतो. ‘मामी, माझी शिटटी कुठे आहे,’, ‘मामी, माझा भोवरा कुठे आहे?’ असे प्रश्न विचारीत जिन्याच्या एकेक पाय~या उतरू लागतो...
माझे घर, माझे गाव सोडून आपल्या घरी, आपल्या गावी जाण्यासाठी आवराआवर करू लागतो....
माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते...
रेडियोवर वसंतराव गात असतात-‘दाटून कंठ येतो...’
उरात कालवाकालव दाटते...
कपिलच्या निघून जाण्याच्या कल्पनेने मी व्याकुळ होतो !
मन आक्रंदू लागते...
‘कपिल तू जाऊ नकोस! कपिल तू जाऊ नकोस!’
पण-पण जाणारच तो! आज ना उद्या जाणारच की! जावेच लागणार आहे त्याला....तो काय कायमचा असा थोडाच राहायला आला आहे आपल्य़ाकडे? पाखरू कितीही आकाशात नाचले तरी शेवटी त्याचे पंख स्वत:च्या घरटयाकडे वळणारच !
कपिल तू जा! आपल्या घरी जा! सुखाने जा!
तुझे जीवन कुमारांच्या तानेसारखे झळकत राहो!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा