सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

नशिब माझे की, कपिलने ‘मामा, मामीप्रमाणे तू का गळ्यात मंगळसूत्र बांधत नाहीस?’ असा कधी प्रश्न केला नाही.
परंतु एक प्रश्न मात्र तो अधून मधून कारीत असे, आणि तो म्हणजे, ‘मामा, मामीच्या बोटात जशी अंगठी आहे, तशी तुझ्या बोटात का नाही?’
मग मीही त्याच्या प्रश्नाला हिच्याकडे पाहत हंसत हंसत उत्तर देत असे-‘अरे, मामी श्रीमंत आहे माझ्यापेक्षा, मी गरीब आहे...म्हणून तिच्या बोटात अंगठी आहे!’
“चांगलं फसवतोस की मला!’ अशा अर्थाने मान हलवून तो मला पुन्हा प्रश्न करी- ‘वा रे वा! तू आणि गरीब?’
मग तो मला माझ्या श्रीमंतीची लक्षणे सांगत सुटे. मीही ती लक्षणे भाराभर खोडून टाकत सुटत असे आणि त्याची मामीच कशी श्रीमंत आहे, ते भक्कम पुराव्यांच्या आधारे त्याला सांगत असे....अशा वेळी त्याची मामी मात्र माझ्याकडे लाल रंगाने पाहत असे!
आपल्या प्रत्येक गोष्टीची स्थिती हवा गेलेल्या फुग्यासारखी होते आहे, हे पाहून शेवटी त्याने एकदाचे माझे दारिद्र्य मान्य केले!
पण किती दिवस? तर अगदी मोजकेच!
कारण एका गाफिल क्षणी त्याने मला कैचित पकडले, नुसते पकडले नव्हे, तर माझी श्रीमंती मला ‘याचि देही-’ दाखवून ‘बाप दाखव, नाहीतर-’ अशी माझी स्थिती करून सोडली. तेव्हापासून त्याच्या दृष्टीने मी गरीब तर राहिलो नाहीच, उलट श्रीमंत-गर्भश्रीमंतच बनून गेलो! शेवटी झक मारत त्याने दाखून दिलेली माझी श्रीमंती मला मान्य करावी लागली...
म्हणजे जे घडले ते असे:
मला स्वत:ला कुमार गंधर्व फार आवडतात. कोणतीही चीज सुरू करण्यापूर्वी ‘य्य्य्ये sss-’अशी सुरू होणारी त्यांची मोजकीच पण विशिष्ट आलापी, शब्दांचे मधाळ आणि लडिवाळ उच्चार, क्षणात ‘केव्हा बद्ध सुपर्ण पंख उधळी तोडावया अर्गल’ तर पुढच्याच क्षणाला ‘केव्हा नाजुक पाकळ्यांत अडके, बागेतला तस्कर’ अशा भावणा~या त्यांच्या ताना, माना नसलेल्यांनाही डोलायला लावणारा विशिष्ट ‘वजना’ चा तबल्यावरचा ठेका- सारे सारे फार आवडते! संवेदनांच्या तुलशीवृंदावनात उत्पत्तिस्थितीलयदेवतांचा साक्षात्कार होतो!
मी फार चांगले गातो, अशातला भाग नाही. पण जे काही वेडेवाकुडे गातो, त्यात डोकावणारे कुमार गंधर्व माझ्या मित्रमंडळींना जाणवतात आणि ते माझी कधी कौतुक तर कधी चेष्टा करतात!...
तर गेल्या दिवाळीतील गोष्ट. ‘राष्ट्रीय सेवा योजने’ चे दहा दिवसांचे शिबिर आमच्या काँलेजमध्येच भरले होते. प्राचार्याची अनेक सूचनांपैकी हीही एक सूचना होती, की रोज रात्री स्थानिक कलाकारांचे तासाभराचे मनोरंजनाचे कार्यक्रम घडवून आणायचे. ...
ठरल्याप्रमाणे माझ्याही वाटयाला एक रात्र आली....
सुरुवातीला मी काही मराठी नाटयगीते, भावगीते व भक्तिगीते म्हणायची, असे ठरविले. पण पुन्हा विचार केला, तीच ती-तीच ती गाणी म्हणण्याऎवजी एखादा वेगळा कार्यक्रमच बसविता येतो काय, ते पहावे....
दरम्यानच्या काळात कुमार गंधर्वांची काही हिंदी पदे कानावरून गेली होती व त्यातून माझी अशी एक आगळी कल्पना आकारू लागली ....
कबीरवाणी! संत कबिरांची निवडक पाच पदे.
प्रथम संत कबिरांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा परिचय आणि नंतर त्याला अनुरूप आसे एक पद-बस्स!
जुन्या वाडयातल्या सुजाता, ‘तुप्पी’, उजव्या घरातला विजू, डाव्या घरातली मंदा अशा चार-पाच मुला-मुलींचा संच तयार केला. एकाच्या हातात अँल्युमिनियमचा रिकामा डबा, एकाच्या हातात टाळ, एकाच्या हातात हार्मोनियमचा भाता. हार्मोनियमवर बारीकसे दोनच सूर-षडज आणि पंचम! सोबत दीपचंदी ठेका. ..
कार्यक्रम झकास झाला. लोकांनी कौतुक वगैरे वगैरे केले.
सांगायचे मुख्य म्हणजे हे सर्व कपिलच्या डोळ्यांपुढेच घडत होते. हा सर्वस्वी नवा अनुभव त्याने टीपकागदी नजरेने टिपून घेतला होता. ...‘कोरस’ मधील त्याचा आवाज तर ‘समे’ प्रमाणे उठून दिसत असे!
पुढे पुढे तर आमची रात्रीची जेवणे झाल्यानंतर ‘कबीरवाणी’ चा
कार्यक्रम अपरिहार्यच होऊन बसला...
काही दिवसानी मधल्या वाड्यातल्या वसंतकाकांनी मला हार्मोनियमऎवजी एकतारी आणि अँल्युमिनियमच्या रिकाम्या डब्याऎवजी मातीचा माठ घेण्याची सूचना दिली. मग लगेच कुंभार गल्लीत जाऊन एकनाथ कुंभाराकडून एक माठ विकत आणला. पण आमच्या ‘माठिया’ च्या हातात काही माठ ‘टिकेचिना’. दोन-तीन माठ फुटले आणि आम्ही माठाला कायमचे ‘खाट’ केले...
आता एकतारीचा नंबर! पण योगायोगाने आमच्या या कार्यक्रमाची कल्पना आवडून विजूताईंकडून ‘सप्रेम भेट’ या सदराखाली एक एकतारी मिळाली.
एकतारी मिळाली खरी, पण तिथेही घोडे अडलेच! कारण ती हातात घेणार कोण, असा बिकट प्रश्न निर्माण झाला. मला तर हातात कोणतेही वाद्य घेऊन गाणे म्हणायची संवय नव्हती. एक तर वाद्य बंद होऊन गाणे तेवढेच म्हटले जाते किंवा गाणे बंद होऊन वाद्यच तेवढे वाजविले जाते!
बरं, आणखी कुणाच्या तरी हातात ते वाद्य द्यावे म्हटले तर संचातील मंडळी एकतारीपेक्षाही लहान!
शेवटी मी हिच्याच हाती एकतारी द्यायची ठरवली.
दिलीही. पण हिला काही एकतारी वाजवायचे जमेना...काही मिनिटांतच एकतारीचे ‘बिनतारी’ त रूपांतर करून दाखविण्याची किमया हिने पेश केली...
मग मी तारा आणल्या.
हिने पुन्हा त्या छेडण्याऎवजी तोडल्या...
शेवटी कंटाळलो, कंटाळलो, कंटाळलो. चिडलो, रागावलो, भडकलो. आणि अखेरीस मीच हातात एकतारी घेऊन कबिरांची पदे गाऊ लागलो...
सांगायचा मुद्दा म्हणजे कपिलच्या नजरेतून हे ‘नाटय’ ही सुटले नाही. नव्हे, ते त्याच्या मनात कुठेतरी खोल खोल रुतून बसले असावे...
माझ्या ध्यानीमनी नसताना, माझे दोन्ही हात घट्ट धरून तो एकदा मला म्हणाला,
‘मामा, तू गरीब आहे, म्हणतोस, खरं मामीपेक्षा तुलाच एकतारी वाजवायला येते की नाही, सांग!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा