सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

कपिलचे डोके जसे गाण्यात चालते तसे चित्रकलेत मात्र अजिबात चालत नाही. परंतु त्याने चित्रकला शिकावी, त्याला चित्रेही काढता आली पाहिजेत, अशी आम्हा उभयतांची तीव्र इच्छा! त्यासाठी मुद्दम हिने त्याला सहज पुसता येण्यासारखी कोल्हापूरहून ‘मँजिक स्लेट’ आणून दिली. पेन्सिल, खोडरबर, रंगपेटी, को~या कागदाची वही, पेन्सिलीला टोक करण्यासाठी ‘गिरमिट’-सर्व काही आणून दिले. पण व्यर्थ!
मग ही एकदा त्याला म्हणाली,‘ हे बघ, तुला परीक्षेत पुढे प्राण्यांची म्हण, भांडयांची म्हण, फुला-प्राण्यांची, पक्ष्यांची-अशी वेगवेगळी चित्रे काढावी लागणार आहेत की नाही?’
‘हो-’
‘मग तुझी तुला स्वतंत्र चित्रे काढायला आली पाहिजेत. जे जे चांगले आहे, ते ते सर्व आपल्याला आले पाहिजे रे! आले पाहिजे की नको?’
‘आले पाहिजे..’
‘ मग त्यासाठी तुला शिकले पाहिजे. होय की नाही?’
‘होय, पण-पण मला येत नाहीत की!’ त्याचा रडवा सूर.
‘येत नाही, म्हटले की येतच नाही. आणि हे बघ, कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला ‘येत नाही’ असे म्हणू नये. ‘येतेच’ म्हणावे! अरे, कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय कशी येणार, तूच सांग! तुला अगोदर गणितं येत होती काय वजा-बाकीची?’
‘नाही’
‘पण आता येतात की नाही?’
‘येतात,’
‘मग ती शाळेतल्या बाईंनी, मामांनी, मी शिकवल्याशिवाय, आणि मुख्य म्हणजे तू स्वत: शिकल्याशिवाय येतात काय?’
‘नाही,’
‘मग? अरे, शिकायचे! कुठलीही गोष्ट शिकायला नाही म्हणू नये! शिकल्याशिवाय कुठलीच गोष्ट येत नाही-येते?’
मामीच्या प्रश्नाला तो नकार्थी मान हलवी. कारण त्याला सगळे पटत असे. कळत असे. पण अजून तरी त्याची स्थिती ‘तुज कळते परि ना वळते’ अशीच आहे. कदाचित चित्रे काढायला त्याला आवडत नसावे. किंवा ‘चित्रा’ तल्या चित्राप्रमाणे आपली चित्रे दिसत नाहीत, म्हणून नाराज होऊन कदाचित चित्रे काढण्याबद्दल त्याच्या मनात नावड निर्माण झाली असावी! कारण ‘रेडियोतल्या माणसांप्रमाणे मला गाणे म्हणता का येत नाही?’ किंवा ‘माझा आवाज त्यांच्यासारखा का नाही?’ वा ‘पुस्तकातल्या अक्षरांप्रमाणे मला का लिहिता येत नाही?’ यांसारखे तो नेहमी प्रश्न करतो आणि ‘रोज प्रँक्टीस केली की येते’, असे उत्तर दिले की त्याला पटते.
मग ‘तांब्या’ घेऊन जातानाही तो ‘पंढरी’ ला जातो!
अर्थात, गण्याची गोष्ट निराळी आणि चित्रांची गोष्ट निराळी! म्हणून वाटते, की मुळातच त्याच्या मनात चित्रे काढण्याबद्दल प्रेम नसावे!
पण असे असले तरी वेगवेगळी चित्रे जमविण्याची, चित्रे पाहण्याची आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे आपल्याला आवडणारी चित्रे दुस~यांकडून काढून घेण्याची त्याची हौस मात्र दांडगी आहे. गेल्या जन्मात तो कोणत्या संस्थानचा संस्थानिक होता कुणास ठाऊक!
-आणि त्याच्या आवडीच्या चित्रांमध्ये अधिकाधिक चित्रे कुणाची चित्रे असतात माहीत आहे? त्याचे बाबा पोलीस खात्यात आहेत म्हणूनही असेल कदाचित- पण पोलिसांची!! पोलिसांना घाबरून चोर पळताहेत, चोरांच्या मागे पोलीस धावताहेत. पोलिसांच्या हातात पिस्तुल्स आहेत. आणि ते पिस्तुलातून सटासटा गोळ्या झाडताहेत! बस्स- हीच त्याची आवडती चित्रकल्पना!
या चित्रबद्दलचे प्रेम त्याच्या खेळावरील प्रेमातून झाले असावे, असा माझा तर्क आहे. कारण त्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात, अर्थातच चित्र काढणे सोडून, त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे खेळ! शेजारच्या नंदू, चंदू अशा चार-पाच मित्रांना जमवून संध्याकाळच्या वेळी व सुटीच्या दिवशी तो नाना खेळ खेळतो. साधारणपणे प्रत्येक खेळाची साधने जरी वेगवेगळी असली तरी कोणताही खेळ खेळताना तो त्या त्या खेळाच्या विशिष्ठ साधनांसाठी अडून बसत नाही. क्षणात क्रिकेटचा रबरी बाँल ‘हाँलीबाँल’ बनतो, हाच हाँलीबाँल दुस~यादिवशी ‘फुटबाँल’ बनतो, क्रिकेटच्या बँटची ‘हाँकी-स्टिक’ बनते...
पण सर्व खेळांत आवडीचा-अत्यंत आवडीचा खेळ म्हणजे - चोरशिपाई!...
चार चोर आणि दोन-तीन शिपाई! चोर चोरी करतात. मग शिपाई लपून बसतात. शिपाई चोरांना शोधू लागतात. शोध-शोध-शोधतात. आपण सापडणार असे दिसताच चोर पळू लागतात. शिपाई चोरांचा पाठलाग करू लागतात. शिपाई चोर न सापडल्याचे नाटक करतात....शेवटी शिपाई आपल्या हाताच्या पंजाच्या ‘खोटयाखोटया’ पिस्तुलातून पण ‘तोंडा’ ने गोळ्या झाडतात. पाचपन्नास ‘खोटेखोटे’ चोर खरेखरे मरतात. मग ‘खरे खरे’ चोर जखमी होतात. शिपायांच्या हाती सापडतात. मग हातात खोटयाखोटया बेडया ठोकून खोटयाखोटया चोरांची खोटयाखोटया तुरुंगात खोटीखोटी रवानगी होते...
आणि हो, हे खोटेखोटे शिपाई खोटीखोटी का असेना, पण ‘व्हिस्की’ ही पितात बरं का! ¥À¥Àपण जेव्हा त्यांचे ते ‘व्हिस्की प्रकरण’ हिला समजले तेव्हा हिने त्या शिपायांना चांगलाच दम दिला. तेव्हापासून त्या शिपायांनी खोटीखोटी व्हिस्की खोटीखोटी पिण्याचे कायमचे सोडून दिले...पण खोटेखोटे नाही हं! अगदी ‘खरे-खरे’ च सोडून दिले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा