सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

जेव्हा तो राहायला म्हणून माझ्याकडे प्रथमच आला तेव्हा माझ्या काँलेजची मे महिन्याची सुटी अजून संपायची होती. त्यामुळे त्यची शाळा सुटल्यानंतर मी त्याला रोज संध्याकाळी फिरायला म्हणून माळावर नेत असे. मधल्या वाटेने. अंगावर हिरवे , पिवळे पीक खेळवीत पहुडलेल्या शेताच्या बांधावरील पायवाटेवरून!!
पहिल्याच दिवशी त्याने मला हे झाड कशाचे, ते झाड कशाचे, या फुलाचे नाव काय, त्या फुलाचे नाव काय, या पानाचा असाच का रंग आहे,, त्या पानाचा तसाच का रंग, या शेताचे मालक कोण आहेत, तुझे शेत आहे की नाही- असे हज्जार प्रश्न करून हैराण हैरण करून सोडले...
sजेव्हा आम्ही शेताची सीमा ओलांडून माळाच्या सीमेत प्रवेश केला तेव्हा तर तो कपाळाला डावा आत लावून आश्चर्याने जवळजवळ ओरडलाच. म्हणाला,
‘आबाबाबाबाबाबाबाssss-’
‘काय झाले, रे?’
‘केवढा मोठ्ठा रे हा माळ, मामा!’ त्या माळापेक्षाही आपले डोळे मोठे करीत तो म्हणाला, ‘वाट्टेल तेवढया लांब दगड टाकावा बघ, कुणाच्याच घरावर पडणार नाही...होय की नाही?’
आता मात्र कपाळाला हात लावण्याची पाळी माझ्यावरच आली!
पण मी कपाळाला हात लावण्याआधीच त्याने माझ्याकडे आणखी एक प्रश्न टाकला, म्हणाला,
‘मामा, मी एक दगड फेकू?’
‘हो, फेक की!’ मी त्याच्या बालसुलभ प्रवृत्तीला हिरवा कंदिल दाखवला.
‘तसं नव्हे, नक्की फेकू काय?’
‘हो, नक्की-नक्की फेक!-’
‘नंतर रागवायचं नाही-
‘नाही-नाही!’
‘बघ-’
कारण इतकी मोठठी रिकामी जागा, त्यातही जनवस्ती नसलेली, तो पहिल्यांदाच पाहत होता ना!
‘पण मामा,’ त्याने ‘शहरी’ भीती व्यक्त केली, ‘मी जर दगड मारला आणि तो जर कुणाच्या घरावर जाऊन पडला - तर?’
‘पण इथं कुठं आहे घर जवळ दगड पडायला?’
‘ते बघ, ते बघ ते घर-’
त्याने एक फर्लांग अंतरावरची काळी कौलारू खोप दाखवली. मी म्हटले, ‘काही होत नाही, तू खुश्शाल फेक दगड हवे तितके-’
मी त्याला धैर्य दिले.
‘पण त्या घरावर जर दगड पडला आणि कौलं फुटली तर जबाबदार तू!’
गुन्ह्याअगोदरच त्याने मला कैद केले...
त्या संध्याकाळी त्याने कितीतरी दगड, लहान मोठे खडॆ असे समोर लांब आणि वर आकाशात मनसोक्त भिरकावले.. मी शेजारच्या बांधावरचे खडे-लहानलहान दगड त्याच्या पायाजवळ आणून ठेवत होतो आणि अंगातली सारी शक्ती एकवटून तो ते फेकत होता- एखाध्या धनुर्धारीने स्पर्धेचा सराव करावा, त्या असल्याप्रमाणे!
सूर्य बुडू लागला...
तरी पण त्याचा दगड फेकण्याचा खेळ संपेना.
सूर्य बुडाला. दिशा अंधारून आल्या. तरीही-
ªÀmमग मीच त्याचा मोठठा खडा फेकण्यासाठी वर केलेला हात वरच्यावर घट्ट पकडला आणि रागाने म्हणालो,
‘पुरे बाबा, आता! अंधार झाला, घराकडे परतूया-’
‘आता फक्त एकच मामा, फक्त एकच खडा-’
‘एक नाही आणि दोन नाही,’ मी थोडेसे उग्र रूप धारण केले, म्हणालो, ‘तिकडे मामी घरात दोघांच्याही नावाने खडे फोडत बसली असेल..’
त्या संध्याकाळी मी जवळ जवळ त्याला माळावरून ओढतच घरी नेले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा